Search This Blog

Wednesday, 26 September 2018

जलयुक्त शिवार प्रसिध्दी अभियानासाठी पुरस्कार योजना प्रस्ताव सादर करण्यास 20 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ

चंद्रपूर, दि.24 सप्टेंबर – राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार व प्रसिद्धी  तसेच जनजागृती केली आहे. अशा पत्रकारांच्या प्रवेशिका 20 ऑक्टोंबर 2018 पर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय तसेच राज्यस्तरीय  पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार राहणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 31 हजार, द्वितीय पुरस्कार 21 हजार  व तृतीय 15 हजार बक्षीसाची रक्कम राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे  प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी बातमीदाराकडून 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य संपादकाच्या शिफारशीसह तीन प्रतीत मागविण्यात येत आहे.
विभागीय पुरस्कार राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार 50 हजार, द्वितीय 35 हजार व तृतीय 25 हजार रुपये आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतीराव फुले जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार  71 हजार व तृतीय पुरस्कार 51 हजार राहणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर तीन पुरस्कार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लक्ष, द्वितीय पुरस्कार 71 हजार तर तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये आहे. यासाठी राज्यस्तरावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्या प्रतिनिधींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.   
                                                                000

स्पर्धा परीक्षांच्या यशस्वीतेसाठी लोकराज्य उत्तम संदर्भ साहित्य:भैय्याजी येरमे स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रामध्ये लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम


चंद्रपूर दि.21  सप्टेंबर : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करताना राज्य शासनाची अधिकृत भूमिका मांडणाऱ्या व योजनांबाबत सविस्तर माहिती देणाऱ्या लोकराज्यचे वाचन उत्तम संदर्भ साहित्य म्हणून आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत राज्यभरात सुरू असलेल्या लोकराज्य वाचन अभियानाअंतर्गत राणा कोचिंग क्लासेस या स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी राज्य शासनाच्या असणाऱ्या विविध योजना व उपाययोजनांबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला राणा कोचिंग क्लासेसचे संचालक इरशाद शेख, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, रामराव दोडके उपस्थित होते. 
            यावेळी बोलताना त्यांनी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना, राज्य शासनाची धोरणे, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती, त्यांच्या यशाची सूत्रे व वेगवेगळ्या परीक्षांबाबतची माहिती लोकराज्याच्या पानापानांमध्ये असते. त्यामुळे  स्पर्धापरीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लोकराज्य या पुस्तकाला आपल्या दैनंदिन वाचनामध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे  सांगितले. याशिवाय राज्य शासनाच्या वाटचालीवर विश्लेषण करणार्‍या प्रत्येकाने या मासिकाच्या वाचनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मार्गदर्शन करताना अवघ्या शंभर रुपयांमध्ये  बहुमूल्य साठ पानांचे 12 रंगीत अंक राज्य शासन अल्पदरात प्रत्येकाला देत असून राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही उपाययोजना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच घरातल्या प्रत्येकाने लोकराज्य अंक वाचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            संचालक श्री.इर्शाद शेख यांनी यावेळी स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असणे गरजेचे असते. लोकराज्यच्या अंकामध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारी बाबतची सविस्तर माहिती असते. हा अंक तयार करताना विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा विचार केला जातो. त्यामुळे हा अंक स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित रामराव दोडके यांनी जिल्हा माहिती कार्यालय येथे या अंकासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
                                                                                                0000

Thursday, 6 September 2018

विविध शैक्षणिक योजना, यशकथांचा समावेश असलेला लोकराज्य सप्टेंबर अंक प्रकाशित


चंद्रपूर, दि.6 सप्टेंबर - लोकराज्य सप्टेंबर विशेषांकाचे प्रकाशन अतिथी संपादक तथा कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. 
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, संपादक सुरेश वांदिले,‍ विभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडके, वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहाय्यक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते.
या विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये द्रष्टा राजर्षी, शैक्षणिक क्रांतिचे जनक, गाव तेथे शाळा, सामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे.
शैक्षणिक योजनांची माहिती
या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ झाला अशा लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. ही माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. अंकाची किंमत दहा रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
                                                0000

Wednesday, 5 September 2018

राष्ट्रीय चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज- देवराव भोंगळे जिल्हयातील 16 आदर्श शिक्षकांचा गौरव




चंद्रपूर, दि.5 सप्टेंबर – आज ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यासमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज  कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे, रणजित सोयाम, गोपाळा दडमल, नितू चौधरी, रोशनी खान, कल्पना पेचे, योगीता डबले, मेघा नलगे, जे.डी.पोटे आदी उपस्थित होते.
            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिक्षक हा समाजाला दिशा देण्याचे काम करण्यासोबतच बालमनावर प्राथमिक शिक्षणाचे चांगले संस्कार देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी आपल्या शाळेचे विद्यार्थी कसे पुढे जाईल आणि आपल्या तालुक्याचा, जिल्हयाचा नाव कसा पुढे येईल यावर लक्ष देवून शिक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रतिभा संपन्न, नितिमूल्य जोपासणारे शिक्षण देण्याची गरजही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता नवीन टेक्नॉलाजी जरी आली तरी ग्रामीण भागातील शिक्षकांनी ते आत्मसात करुन विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षकांनी करावे असेही त्यांनी सांगितले.
            कोणत्याही  विद्यार्थ्यांमध्ये दोष नसतो आधीच्या आणि आताच्या शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्यासाठी सतत प्रयत्न करावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले.  उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेशही  वाचून दाखविण्यात आला.
 ज्या शिक्षकांचा आज आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला त्यामध्ये दिलीप पायपरे, हेमंत वाग्दरकर, दिपलक्ष्मी म. कापकर, अर्चना नवघडे, जिवनदास डोंगरे, गजेंद्र जवंजाळ, प्रमोद तुपट,  विठ्ठल वनसिंगे, कमलेश सावसाकडे, गंगाधर गायकवाड,  अरूण  झगडकर, प्रमिला डाहुले,  वैशाली तुम्मे,  विष्णु बडे, चंदा धारणे,  नरेश  बोभाटे  यांचा समावेश आहे.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे यांनी तर संचालन विस्तार अधिकारी अर्पण माशीरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (प्राथमिक) अरुण काकडे  यांनी केले. यावेळी मोठया संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते.
                                                            000

Tuesday, 4 September 2018

स्पर्धा परिक्षांच्या यशांचा राजमार्ग लोकराज्य वाचनातून जातो – सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी




लोकराज्य वाचक अभियानाला चंद्रपूरमध्ये थाटात प्रारंभ
            चंद्रपूर, दि.1 सप्टेंबर – स्पर्धात्मक परिक्षांच्या वाचन चळवळीला लोकराज्यने गती आणली आहे. लोकराज्य स्पर्धा परिक्षेमध्ये तयारी करण्यासाठी दर्जेदार वाचन साहित्य आहे. शासकीय नौकरीत येणा-यांनी व स्पर्धा परिक्षेत करीयर घडविण्यात इच्छुक असणा-यांनी  लोकराज्यचे वाचन नियमितपणे करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात लोकराज्‍य वाचन अभियान राबविण्यात येत आहे. एकाचवेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये 1 सप्टेंबरला लोकराज्य अभियानाला आज सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाची चंद्रपूर येथील शानदार सुरुवात स्थानिक समाज कल्याण आयुक्त कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. या अभियानाच्या पहिल्या अभिनव कार्यक्रमात जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा समाज कल्याण विभाग, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उपक्रमातील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
            या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टये म्हणजे स्पर्धा परिक्षांसाठी राज्य शासनामार्फत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग राबवित असलेल्या प्रशिक्षणार्थींचा सहभाग, जिल्हयात नव्याने सुरु झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी व समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी यांचे एकत्रित येणे होते. या मेळाव्यामध्ये वेगवेगळया क्षेत्रातील गुणवान विद्यार्थ्यांची वैचारिक देवाण-घेवाणही यावेळी झाली. या कार्यक्रमाला  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी बी.पी.वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, गृहपाल प्रशांत रामटेके उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करतांना समाज कल्याण विभागामार्फत स्पर्धा परिक्षांसाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडण-घडणीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती प्रसाद कुलकर्णी यानी दिली. तर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी बी.पी.वाघमारे यांनी या विभागामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची व नोंदणीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांनी वाचाल तर वाचाल या उक्तीचा अर्थ समजून घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी देखील दर्जेदार वाचनासाठी लोकराज्य सारखे अधिकृत वाचन साहित्य संदर्भ म्हणून वापरण्याचे स्पष्ट केले. व्हॉटस्ॲप सारख्या नव्या माध्यमापासून सावध राहण्याचे व योग्य तो वापर करण्याचे सांगितले. तसेच युवा माहिती दूत उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.                              
  00000