धानावरील खोडकिडी व गादमाशीचे
एकीकृत किड व्यवस्थापन करा : डॉ. प्रविण राठोड
चंद्रपूर, दि.13 जुलै: किड व रोगामुळे भात पिकाचे नुकसान होवून उत्पादनात 20 ते 25 टक्के घट येवू शकते. किडीमुळे होणारे नुकसान याची ओळख किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने व उत्पन्नामध्ये किडीच्या नुकसानीमुळे होणारी घट टाळण्यासाठी सुरुवाती पासुनच किड व्यवस्थापनाची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे,असे आवाहन किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रविण राठोड यांनी केले आहे.
धान रोवणी सुरू झाली असून मागील खरीप हंगामातील किडीचा प्रादुर्भाव तसेच उन्हाळी हंगामातील कीड व रोगांचा प्रादुर्भाव अभ्यासला असता किडीच्या जीवन चक्रामध्ये उन्हाळी हंगामामध्ये खंड पडलेला नाही. त्यामुळे प्रामुख्याने खोड किडी व गादमाशी या किडीचा प्रादुर्भाव पऱ्हा अवस्थेपासूनच दिसुन येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस 1 हजार 200 ते 1 हजार 500 मि.मी. पडतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये खरीपातील धान पिक कापले की लगेच उन्हाळी धानाचे पऱ्हे नोव्हेंबर मध्येच टाकल्या जातात तसेच धान बांधीचे धुऱ्यावर असणाऱ्या तणांवर सुध्दा या किडी उपजिवीका करतात. किडींना वर्षभर मुबलक अन्न उपलब्ध असते. या एक पिक पद्धतीमुळे तेच ते पिक घेतल्याने किडी व रोगांचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. अशावेळी धान पिकाचे सुरूवातीपासूनच कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. खोड किडीमुळे पोंगेमर' व गादमाशीमुळे गाभेमर,चंदेरी पोंगा होतो. पोंगेमर म्हणजे खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेंडा पुर्णपणे वाळतो. या किडीचा प्रादुर्भाव उशीरा झाल्यास नुकसान लोंब्या भरण्याच्या अवस्थेत लक्षात येते. उशीरा किड व्यवस्थापनास सुरूवात केल्यामुळे किड व्यवस्थापन करणे कठीण होते व उत्पादनात होणारी घट टाळता येत नाही त्यामुळे पिकांच्या नुकसानी पासून बचाव करावा, असे एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन संदर्भात प्रत्यक्ष बांधावर सखोल मार्गदर्शन किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रविण राठोड यांनी केले आहे.
भात पैदासकार डॉ. मदन वांढरे यांनी धानाच्या विविध जाती तसेच योग्य बियाणे निवडी विषयी मार्गदर्शन केले. सहयोगी प्राध्यापक डॉ.उषा डोंगरवार यांनी धानाचे तण व खत व्यवस्थापन तसेच जिवाणू खताचे महत्व, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाहीच्या वतीने कच्चेपार येथे हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्य कृषि संजीवनी सप्ताह व कृषिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गजानन लोणारे व दत्तुजी हटवादे तसेच श्री.बोरकर यांच्या शेताच्या बांधावर करण्यात आले. या प्रसंगी सरपंचा श्रीमती पेंदाम, तसेच उपसरपंच श्री.वारजूरकर,पोलीस पाटील दत्तुजी हटवादे तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.
000000

No comments:
Post a Comment