Search This Blog

Saturday, 20 June 2026

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विशेष ग्रामसभा

 प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विशेष ग्रामसभा

Ø निवड झालेल्या गावांमध्ये 23 ते 25 जून या कालावधीत आयोजन

चंद्रपूर, दि. 20 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उपक्रमांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आणि तळागाळातील सहभाग बळकट करण्याच्या उद्देशाने, चंद्रपूर जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांमध्ये 23 ते 25 जून 2026 या कालावधीमध्ये ग्रामसभेचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामसभांना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या ग्रामसभेमध्ये 1) प्रधानमंत्री आदर्श  ग्राम योजनेची उद्दिष्टे आणि घटक यांविषयी जनजागृती मोहीम, 2. अनुसूचित जातीच्या गावाच्या विकासात्मक गरजांची ओळख व प्राधान्यक्रम निश्चित करणे, 3. सामुदायिक सहभागाची उभारणी आणि पंचायती राज संस्था व ग्रामीण विकास संस्थांचा सहभाग, 4. विविध उपजीविका, शिक्षण आणि कौशल्य विकास उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे, 5. योजनेंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा आणि इतर केंद्र/राज्य सरकारच्या योजनांशी समन्वय, 6. 'आदर्श ग्राम' म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये 50 सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे आणि 15 ग्रामीण पायाभूत सुविधा परिपूर्ण करण्याचे नियोजन, 7. ग्रामसभेत आदर्श ग्राम योजनेचे शासन निर्णय वाचून दाखविणे, तसेच संबंधित गावांचे बेस लाईन स्कोर समजावून सांगणे, 8. ज्या गावांना निधी मिळून 2 वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. त्याच्या खर्चाचा व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची स्थितीचा आढावा घेणे आदी विषय घेण्यात येणार आहे.

ग्रामसभेमध्ये ग्राम महसुल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, पोलिस पाटील, मख्याध्यापक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, समाज कल्याण निरीक्षक/वसतिगृहाचे गृहपाल, स्थानिक अनुसूचित जातीचे बचत गट, ग्राम संस्था पदाधिकारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती, सफाई कर्मचारी, बँक सखी, स्थानिक सीएससी केंद्र चालक इ. कर्मचारी यांचा समावेश आहे.

तरी संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी 23 ते 25 जून रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

oooooo

No comments:

Post a Comment