एचआयव्हीसह जगणा-या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ
चंद्रपूर, दि. 09 : देशात एचआयव्ही / एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल उचलत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात ‘मिशन एड्स सुरक्षा’ या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 1 डिसेंबर 2027 पर्यंत जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविणे हा आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत एचआयव्हीसह जगणारे जे नागरिक आहेत, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.
यात 3600 एचआयव्हीग्रस्त नागरिकांना बाल संगोपन योजनेचा लाभ, 5172 जणांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, 28 नागरिकांना मिशन वास्तल्य योजना, 771 नागरिकांना शिधापत्रिका, 53 जणांना अंत्योदय योजना, 269 जणांना आधारकार्ड वाटप, 4700 नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र वाटप, तर 2869 एचआयव्हीग्रस्त नागरिकांना बस पास योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
राज्यात सध्या अंदाजे 4 लाख रुग्ण एचआयव्हीसह जगत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 13796 नागरिक एचआयव्हीबाधित असून 6650 रुग्ण उपचारावर आहेत. संसर्गाचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून 2027 पर्यंत ‘एडस् मुक्त जिल्हा आणि 2030 पर्यंत ‘एडस् मुक्त महाराष्ट्र’ करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
अंमलबजावणीसाठी ठोस रणनीती :
1) टेस्टिंग कव्हरेज : आयसीटीसी केंद्रासोबतच पीएचसी व अन्य आरोग्य केंद्रात एचआयव्ही / सायफिलीस, हिपॅटायटीजच्या चाचण्या वाढविणे. 2) उपचारात सातत्य : एचआयव्हीग्रस्त रुग्ण उपचार सोडून देणार नाही यासाठी 48 तासात फॉलोअप घेणे. 3) माता बाल आरोग्य : गर्भवती महिलांची 100 टक्के तपासणी करून बालकांना संसर्गापासून वाचविणे 4) उच्च जोखमीचे गट : स्थलांतरीत कामगार, इंजेक्शनद्वारे औषध घेणारे आणि लैंगिक कामगारांसाठी सुरक्षा पध्दतीचा अवलंब करणे.
००००००००
No comments:
Post a Comment