Search This Blog

Tuesday, 30 June 2026

प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप



प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

Ø शासकीय आश्रम शाळा पाटण येथे विविध शैक्षणिक सुविधांचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 30 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, पाटण (ता. जिवती) येथे शैक्षणिक सत्र 2026-27 चा प्रवेशोत्सव कार्यक्रम मंगळवारी (दि.30) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, तहसीलदार रूपाली मोगरकर, गट विकास अधिकारी श्री. दोडके, सरपंच सीताराम मडावी, भीमराव मडावी, भीमराव पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बँड पथकाच्या गजरात मान्यवरांचे शाळेत आगमन झाले. प्रवेशोत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी  विद्यार्थ्यांना पुस्तकांचे व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच दहाव्या वर्गामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनी नियमितपणे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. विविध कारण देऊन घरी घेऊन जाऊ नये. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. विद्यार्थ्यांना विविध कौशल्यावर आधारित उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी आश्रमशाळेच्या परिसराचे निरीक्षण करून शाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा व शैक्षणिक वातावरणाबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेतील मॅथ्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ॲस्ट्रोनॉमी लॅबला भेट देऊन, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आधुनिक शैक्षणिक सुविधांची पाहणी केली.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी, मागील दोन वर्षांपासून शाळेचे पालकत्व स्वीकारून आदिवासी विकास विभागाच्या निधीतून तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, लवकरच शाळेत अत्याधुनिक डिजिटल लायब्ररी उभारण्याचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील प्रत्येक वर्ग हा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मान्य करावा, अशी विनंतीही त्यांनी केली

कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत मारडा येथे प्रवेशोत्सव : अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मारडा (मोठा) येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सुरवातीला विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. आकर्षक सजविलेल्या बैलबंडीचे सारथ्य अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी केले.

००००००

No comments:

Post a Comment