Search This Blog

Thursday, 18 June 2026

विषमुक्त शेतीच्या क्षेत्रात सिदूर येथील शेतक-यांनी घडविला आदर्श



विषमुक्त शेतीच्या क्षेत्रात सिदूर येथील शेतक-यांनी घडविला आदर्श

Ø ५४०० लिटर दशपर्ण अर्क व २७ गांडूळ खत बेड्सची निर्मिती

Ø रासायनिक खते व किटकनाशकांना फाटा

चंद्रपूर, दि. १८ : शेतीमध्ये रासायनिक खते आणि किटकनाशकांचा अतिवापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडत आहे. शिवाय मानवी आरोग्यावरही त्याचे परिणाम जाणवत आहे. त्यामुळे रासायनिक खते आणि किटकनाशकांना फाटा देऊन कमी खर्चात सिदूर येथील शेतक-यांनी विषमुक्त शेतीचा प्रयोग करून एक नवीन आदर्श घडविला आहे. गावातील कृषिरत्न महिला पुरुष शेतकरी गटाने तब्बल ५४०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आणि २७ गांडूळ खत बेड्स तयार करून स्मार्ट शेतीत एक नवे पाऊल टाकले आहे.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप' स्पर्धेच्या तीन दिवसीय प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन चंद्रपूर तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत काम करणाऱ्या सिदुर गावाने प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून एकत्रितरित्या संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचा विडा उचलला आहे.

 रासायनिक खते आणि कीटकनाशकांना फाटा देण्यासाठी या गटाने सामूहिक कष्टातून तब्बल २०० लीटर क्षमतेचे २७ ड्रम गोळा केले. त्या माध्यमातून ५४०० लीटर 'दशपर्णी अर्क' (नैसर्गिक कीटकनाशक) तयार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च वाचणार असून विषमुक्त शेतीला मोठी गती मिळणार आहे.  तसेच केवळ कीड नियंत्रणच नव्हे, तर जमिनीची सुपीकता आणि मातीचा पोत सुधारण्यासाठी या शेतकरी गटाने २७ गांडूळ खत बेड्स तयार केले आहेत. यामुळे जमिनीला उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत मिळणार आहे.

हा केवळ एका गटापुरता मर्यादित उपक्रम राहिलेला नाही. तर आता 'कृषिरत्न' गटातील सर्व महिला व पुरुष शेतकरी, संपूर्ण सिदुर गावात रासायनिक शेती सोडून दशपर्णी अर्क आणि गांडूळ खताचा वापर करण्यासाठी जनजागृती करत आहेत. जे शेतकरी दशपर्णी अर्क वापरणार आहेत, अशा शेतकऱ्यांना मोफत दशपर्णी अर्क देण्याचा संकल्प गटाने केला आहे. एकजुटीच्या बळावर सिदुर गावातील शेतकरी गटाने घडवलेला हा इतिहास इतर गावासांठी एक नवी दिशा आणि प्रेरणा देणारा ठरत आहे.

000000

No comments:

Post a Comment