Search This Blog

Wednesday, 17 June 2026

सिंधी विस्थापितांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे


 

सिंधी विस्थापितांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे

Ø विशेष अभय योजनेंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. १७ : राज्यातील अधिसूचित सिंधी विस्थापित क्षेत्रातील निवासी व व्यावसायिक जमिनींचे शर्तभंग नियमितीकरण तसेच फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सिंधी नागरिकांचे दीर्घकालीन प्रलंबित मालकी हक्क व शर्तभंग नियमितीकरणाशी संबंधित प्रश्नांना दिलासा मिळणार असून त्यांना जागेचे पट्टे देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.१७) सिंधी समाज भवन, चंद्रपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरात नायब तहसीलदार प्रियंका मानकर, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, ग्राम महसूल अधिकारी योगेश सागुडले, चांदा राय तसेच महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये सिंधी विस्थापित नागरिकांना विशेष अभय योजना-२०२५ बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, अधिमूल्य भरण्याची कार्यपद्धती तसेच जमिनींच्या शर्तभंग नियमितीकरण व फ्री-होल्ड प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले.

सदर शिबिरात ५७ अर्ज संपूर्णपणे भरून स्वीकारण्यात आले. प्राप्त झालेले सर्व अर्ज पुढील तपासणी व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत. पात्र प्रकरणांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment