21 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
चंद्रपूर : संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने देशभरात 21 जून 2026 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत एकाच वेळी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हा क्रीडा संकूल, बॅडमिंटन हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
योग ही व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त विद्या असून, युवा वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध योग समित्या, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी तसेच ‘मेरा युवा भारत’सह विविध युवा संघटनांच्या सहभागातून योगविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हा योग समितीच्या वतीने मुख्य शासकीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन रविवार 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आले आहे. यापूर्वी सकाळी 6.45 वाजता जलतरण तलाव परिसरात पाण्यातील योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध योग संघटनांचे पदाधिकारी, योगतज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या योग दिन कार्यक्रमात सहभागी होऊन योगाचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००

No comments:
Post a Comment