1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा शेतकऱ्यांच्या दारी
चंद्रपूर, दि. 3 : पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 1962 टोल-फ्री हेल्पलाइनमुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हेटर्नरी युनिट्सच्या माध्यमातून 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत.
सेवा अधिक गतिमान करण्यासाठी आता व्हॉट्सॲप आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. शेतकरी +९१ ९०६३१४२२९९ या क्रमांकावर “HI” संदेश पाठवून पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण, शासकीय योजना तसेच पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी चॅट, ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सल्लामसलत करू शकतात.
ऑक्टोबर 2025 ते मे 2026 या कालावधीत राज्यातील 615 शेतकऱ्यांनी चॅटबॉटचा वापर केला असून 201 व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. घरबसल्या पशुवैद्यकीय सेवा, तात्काळ मार्गदर्शन, वेळ व खर्चाची बचत आणि पशुधनाच्या आरोग्यात सुधारणा हे या उपक्रमाचे प्रमुख लाभ आहेत.
पशुपालक व शेतकरी बांधवांनी 1962 हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment