महिला सक्षमीकरण मेळाव्यातून शासकीय योजनांची माहिती
Ø कोरपना येथे आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजन
चंद्रपूर, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने कोरपना येथील स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळेत विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंअंतर्गत महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. आदिवासी महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर विशेष उपस्थिती म्हणून कोरपनाच्या तहसीलदार पल्लवी आखरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा उद्योग केंद्राच्या निलीमा घरट, उमेदचे मोहित नैताम आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्रकल्प अधिकरी विकास राचेलवार, यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांकरिता आदिवासी विकास विभाग, आदिवासी महिलांचे स्वतंत्र बचत गट उमेद / माविम यांच्या सहकार्याने सुरू करणार असून महिला सक्षमीकरणाकरिता या बचतगटांना आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास विभाग यांच्याद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना वित्त पुरवठा करण्यात येईल. तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता विशेष योजना प्रस्तावित करण्यात येतील. विरांगणा राणी दुर्गावती योजनेअंतर्गत नवीन महिला बचतगटांची स्थापना करून आदिवासी विकास विभागातर्फे १०० टक्के अनुदानाच्या योजनांचा लाभ घेऊन आदिवासी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले
यावेळी श्रीमती आखरे यांनी, महसूल विभागातर्फे महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादी योजनांची माहिती दिली. तसेच पात्र व गरजू महिलांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भस्मे यांनी वन स्टॉप सेंटर (माझी कन्या / सखी वन स्टॉप सेंटर) योजनेअंतर्गत कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचार पीडित महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन आदींबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रतिनिधी घरट यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून, नवीन, सूक्ष्म व लघु उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना विशेष प्राधान्य आणि आर्थिक साहाय्य दिले जाते, याबाबत मार्गदर्शन केले. उमेदचे मोहीत नैताम यांनी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) ही ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय योजना असल्याचे सांगून उमेद अभियानांतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य (उदा. बिनव्याजी कर्ज), मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते, अशी माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी मान्यवरांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ केले. संचालन प्राथमिक शिक्षिका प्रिती कुत्तरमारे यांनी तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार यांनी मानले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले, मुख्याध्यापक भाऊराव खडसे, ज्ञानेश्वर गावंडे, सरिता सोयाम, स्वप्नील उराडे, ऋतीक मडावी, भरत आत्राम, अश्विनी कोरंगे, प्रमोद कोडापे, मनोज तुमडाम, प्रेमदास मेश्राम, रोशन मरापे व सुभाष आत्राम स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment