कापूस उत्पादकता अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके
Ø महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 10 : कृषी विभागामार्फत राज्यात कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, या उद्देशाने कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) सन 2026-27 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कापूस पीक प्रात्यक्षिके राबविण्यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पीक प्रात्यक्षिके लाभार्थी निवडीचे निकष : 1) अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी गट 31 मार्च 2026 पूर्वी नोंदणी केलेला असावा. 2) गटाची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर केली जाईल. 3) प्रति गट कमाल 25 शेतकरी व प्रति गाव प्रति पीक जास्तीत जास्त 2 गट निवडले जातील. 4) लाभ द्यावयाच्या शेतकरी सभासदाचा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. 5) शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी हमीपत्र देणे बंधनकारक राहील.
होणारे फायदे : पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुधारित वाण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जल व्यवस्थापन तसेच इतर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाची माहिती मिळून कापूस उत्पादन व उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
सर्व इच्छुक व पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
००००००

No comments:
Post a Comment