बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक
चंद्रपूर, दि. 10 : कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातात. नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली काढण्यात येतात. अर्ज मंजूर / नामंजूर असल्यास एसएमएस द्वारे कारणासह कामगारास कळविल्या जाते. सदरच्या सेवा मंडळामार्फत निःशुल्क राबविण्यात येतात.
बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनाचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात देण्यात येतो. याकरीता कोणतेही शुल्क आकरण्यात येत नाही. ही सर्व कामे ऑनलाईन असून ते कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही. या ऑनलाईन कामाकरीता कोणीही पैशाची / कमिशनची / लाचेची मागणी केल्यास मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावी, अशा सुचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र व तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आल्या आहेत.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी नियोक्ता / ठेकेदार यांनी, त्यांच्याकडे काम करीत असलेल्या व नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांनाच 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे. ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात महानगरपालिका/ नगरपरिषद / नगरपंचायत यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांनाच 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमीत करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून, कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर अथवा ईमेल acbwebmail@mahapolic.gov.in वर तक्रार नोंदवावी. कामगारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्र.भि. कावळे यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment