Search This Blog

Saturday, 6 June 2026

जिल्हाधिकाऱ्यांची आनंदवन प्रकल्पास भेट




 जिल्हाधिकाऱ्यांची आनंदवन प्रकल्पास भेट

चंद्रपूर, दि. 06 : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि. 6) वरोरा येथील आनंदवन प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी आनंदवनचे प्रमुख विकास आमटे यांच्यासमवेत प्रकल्पाच्या कार्यपद्धती, सामाजिक उपक्रम तसेच विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदवन प्रकल्पातील रुग्णालय, निवासी वसाहत, भोजनगृह, बायोगॅस प्रकल्प, समाधी स्थळ, तलाव सिंचन योजना, स्मशानभूमी व्यवस्थापन, निजबल प्रकल्प, संधीनिकेतन प्रकल्प,अंगणवाडी, स्वरानंदवन प्रकल्प तसेच विविध उत्पादन व कौशल्य विकास कार्यशाळांना भेट दिली. त्यांनी या सर्व उपक्रमांचे नियोजन, कार्यपद्धती आणि लाभार्थी केंद्रित व्यवस्थापनाची पाहणी केली.

भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती पंत यांनी प्रकल्पातील नागरिक, रुग्ण व लाभार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. विविध घटकांची संवेदनशीलतेने विचारपूस करत त्यांच्या गरजा समजून घेतल्या. आनंदवनमध्ये स्वावलंबन, पुनर्वसन, कौशल्य विकास आणि सामाजिक समावेशकतेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी प्रकल्पाच्या कार्याचा समाजातील वंचित आणि विशेष गरजा असलेल्या घटकांच्या जीवनमान उन्नतीसाठी होत असलेला सकारात्मक परिणामही त्यांनी जाणून घेतला. आनंदवनमधील विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या आदर्श कार्यपद्धतीची त्यांनी दखल घेतली.

oooooooo

No comments:

Post a Comment