Search This Blog

Wednesday, 17 June 2026

शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळण्यासाठी दक्षता घ्या



 शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळण्यासाठी दक्षता घ्या

Ø जिल्हाधिका-यांच्या कृषी विभागाला सुचना

चंद्रपूर, दि. १७ : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतक-यांसाठी हा हंगाम अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही खते – बियाणांची टंचाई भासणार नाही. शेतक-यांना कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध होईल, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, आत्माचे संचालक अरुण कुसळकर, नाबार्डचे तृणाल फुलझेले यांच्यासह कृषी निविष्ठा विक्रेते तसेच फर्टिलायझर्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते आणि बियाणांचा साठा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, कोणीही खतांची अतिरिक्त साठवणूक करू नये. सर्व शेतक-यांना वेळेवर आवश्यक खते – बियाणे मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी. विक्रेत्यांनीसुध्दा एकाच व्यक्तिला मोठ्या प्रमाणात विक्री न करता, सर्वांना खते मिळतील, याप्रमाणे विक्री करावी. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी. खतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी भरारी पथकाने नियमित तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

खरीप हंगाम २०२६ करीता जिल्ह्यासाठी एकूण मंजूर आवंटन १ लक्ष ८० हजार ८०० मे. टन असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ लक्ष ४७ हजार ७१२ मे. टन साठा प्राप्त झाला. यात युरीया ४२३०६ मे. टन, डीएपी ८१९२ मे. टन, एमओपी ८३१ मे.टन, संयुक्त खते ५६८६४ मे. टन तर एसएसपी ३९५१८ मे. टन यांचा समावेश आहे. एकूण प्राप्त साठ्यापैकी ९७५६३ मे.टन साठ्याची विक्री झाली असून ५०१४९ मे. टन साठा शिल्लक आहे. तसेच बफर स्टॉकमध्ये युरीया ५००७ मे.टन आणि डीएपी ४०० मे.टन आरक्षित ठेवण्यात आल्याचे कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत यांनी सांगितले.

000000

No comments:

Post a Comment