Search This Blog

Monday, 15 January 2018

चंद्रपूरमधून महाराष्ट्रभर जाऊ दया जलसाक्षरतेचा संदेश - ना. सुधीर मुनगंटीवार



·        महाराष्ट्रातील पहिल्या जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन
·        कृषी प्रदर्शनी, बचत गटांच्या विक्री प्रदर्शनीला सुरूवात
·        15 ते 19 जानेवारी चांदा क्लबवर भेट देण्याचे आवाहन

         चंद्रपूर, दि.15 जानेवारी-  भारत हा कृषीप्रधान देश आहे. हे केवळ निबंधात लिहायचे वाक्य न राहता आता शेती ही आमच्या जीवनमानाचा, प्रगतीचा, अर्थार्जनाचा आणि प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. त्यासाठीच राज्य शासन जल, जमीन, जंगल या जीवनचक्राला बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असून जलसाक्षरता ही या श्रृखंलेतील महत्वाची कडी आहे. महाराष्ट्रातील पहिल्या जलसाक्षरता केंद्राचे आज उद्याटन झाले आहे. चंद्रपूर मधून जलसाक्षरतेचा हा संदेश महाराष्ट्रभर जाऊ दया, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
               चंद्रपूर येथील चांदा क्लबवर आजपासून कृषी महोत्सव,  बचत गटांच्या विक्रीचा व प्रदर्शनीचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमाच्या उद्घाटनात विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभही करण्यात आला. 15 ते 19 जानेवारी या काळात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जल, जमीन, जंगल यांच्या बळकटीकरणाला उभारी देणारे विविध मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, प्रदर्शनी व विक्री अनुभवायला मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जलसंपदा विभागाअंतर्गत विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्यावतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन भव्य मार्गदर्शन हॉल, योजना व माहिती, कृषी तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, बिगर सेंद्रीय शेती, यांचे दालन, शेतमाल विक्री माहिला बचत गटांचे विक्री प्रदर्शनी, पशुसंवर्धन विकासांची प्रदर्शनीचे एकूण चार वेगवेगळे दालन अशी चांदा क्लबला व्यापणारी भव्यता यामध्ये आहे. याच व्यासपीठावर विदर्भातील वैनगंगा, वर्धा, वेणा, प्राणहीता, कन्हान, बाघ आणि इरई नदीतील सात कुंभाचे पाणी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांना अर्पण करण्यात आले. त्यांनी हा जलकुंभ वन प्रशासन, विकास, संशोधन व व्यवस्थापन प्रबोधीनीत आजपासून सुरू करण्यात आलेल्या विभागीय जलसाक्षरता केंद्राला अर्पण केला. यासोबतच महाराष्ट्रातील पहिला जलसाक्षत्ता केंद्राचे उद्घाटन झाले.
               या कार्यक्रमाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह देशाचे गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, रमन मैगसेसे पुरस्कार विजेते, जलपुरूष, राजेंद्र सिंह, आमदार नानाजी शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, यशदा पुणेचे उपमहासंचालक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वन व्यवस्थापन विकास प्रबोधिनी संचालक अशोक खडसे, मुख्य अभियंता ब.श स्वामी, अधिक्षक अभियंता के.सु. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, रविंद्र शिवदास, उपमहापौर अनिल फुलझले, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, यांच्यासह जलसंपदा, कृषी, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जलसाक्षरता केंद्र, यशदा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेती या विषयावर सरकार अतिशय गंभीर असल्याचे प्रतिपादन केले. राज्यशासनाने 2017-18 चा अर्थसंकल्पात 63 हजार कोटीची तरतूद केली. शेतीचा थेट संबंध हा पाण्याशी आहे. त्यामुळे देशाचे विख्यात जलतज्ञ ,जलपुरूष राजेंद्र सिंग यांनी जलसाक्षरता हा विषय मांडल्यावर त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून त्याची सुरूवात आज त्यांच्या उपस्थितीत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जंगल आणि जमीन यामध्ये पाण्याच्या साठयाची आवश्यकता सर्वाधिक असून जलसाक्षरता अभियानातील हजारो स्वयंसेवकामार्फत पाण्याचे महत्व गावोगावी कळणार आहे. चंद्रपूर मधून त्याची सुरवात होत असल्याचा मला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी वाचनालयाचा प्रायोगिक प्रकल्प 21 गावांमध्ये सुरू केला आहे. 125 पुस्तके याठिकाणी देण्यात आली आहे. शेतीबद्दल आत्मियता वाढावी हा यामागील उद्देश आहे.उथलपेठमध्ये मशरुमचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष ठेवून आहोत. जिल्हात पंजाब नॅशनल बँकेच्या मदतीने समुद्रपूर येथे शेती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सुरू आहे. चंद्रपूर मध्ये सुरू करण्यात आलेले बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून यामाध्यमातून शेकडो कुटुंबाना रोजगार मिळत असून त्यामध्ये वृद्धी करण्याचा आमचा संकल्प आहे. लवकरच या विभागात कृषीवर आधारीत राष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास केंद्राचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. जिल्हात मदर डेअरीचा प्रकल्प सुरू होत असून मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढवणे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र हे सर्व करतांना यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
               देशाचे गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत गंभीरतेने लक्ष देणे सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील त्यातही विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग भरून निघावा यासाठी  विदर्भातील सिंचन प्रकल्पाला गती दिली आहे. त्यांचा संदेश घेवून जिल्हयात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मोठया उमेदीने अनेक प्रकल्प राबवित असून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारे हे सरकार आहे. केवळ दान अनुदान, कर्जमाफी या लोकप्रिय घोषणांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वृक्ष लागवड, जलसंधारण, जलयुक्त शिवार, जलसाक्षरता, शेतीचा बाजार, शेतमाल विक्री, आयात निर्यात धोरणात बदल आणि वातावरणातील बदल याबाबत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अवगत केल्या जात आहे. प्रत्येक गावातील नाला खोलीकरण हे अभियाण झाले पाहीजे. प्रत्येक गावाचे सिंचनाचे धोरण ठरले पाहिजे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी आपल्या गावातील पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाणी साठे वाढविले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील आता स्वताहून पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.      
               जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार सारखी योजना महाराष्ट्राने यशस्वी केली आहे. या अभियानाला आजच्या जलसाक्षरता अभियानाने बळकटी येणार असून सुधीर मुनगंटीवार हे कृषी क्षेत्रासाठी  अतिशय सकारात्मक असणारे मंत्री असल्याचे प्रतिपादन केले. राज्यात जलयुक्त शिवारने जमिनिखालील पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मिटर पाण्याची पातळी वाढली आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाले असून कृषी जलसंधारण या साठी अर्थसंकल्पात तरतूद करणारे जागरूक अर्थ मंत्री असल्याने नविन प्रकल्प यशस्वी होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्ज माफी देतांना मुनगंटीवार यांनी जलयुक्त शिवार योजनेला कोणतीही कपात सुचवली नाही. ‘जल है तो कल है’ याची जाणीव ठेवणारा वन मंत्री महाराष्ट्राकडे असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी आपल्या घराघरातील वर्षाच्या, महिन्याच्या आर्थिक बजेट प्रमाणे पाण्याचे देखील नियोजन करा, असे आवाहन केले.
               जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंग यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाऊस पाण्याचा बदल लक्षात घेवून पिकाचे नियोजन करा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. भारतातील पहिले जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर येथे सुरू होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अशा पद्धतीचे शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. देशभरातील अन्य नेत्यांप्रमाणे ते देखील चर्चा करतील व विसरून जातील असे वाटत होते. मात्र त्यांनी दोन वर्षात या विषयाचा पाठपुरावा केला, अर्थ संकल्पात तरतुद केली. यशदा, वनविभाग व महसूल विभाग यांना या मध्ये सहभागी केले. हे अभियान सुरू करण्यासाठी  स्वत: संपर्कात  राहून प्रत्यक्ष यंत्रणा उभी केली. गावागावात स्वयं सेवेत काम करणारे जलदूत उभे केलेत. आता ग्रामसभांना आपल्या गावाचे जल आराखडा तयार करण्याचे आपल्या मार्फत सांगावे असे आवाहनही त्यांनी केले.
               या कार्यक्रमामध्ये जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या आयोजनाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या शुभारंभाचे प्रास्तावीक विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालन अविनाश सुर्वे, कृषि महोत्सवाचे प्रास्ताविक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती विद्या मानकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन सुमन पांडे यांनी केले. 19 जानेवारी पर्यंत कृषी प्रदर्शनी चालणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
000

Tuesday, 2 January 2018

‘ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे प्रशासनातील बदल नागरिकांना जाणवतो ’


‘सिध्दी 2017 संकल्प 2018’ अभियानात
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे प्रतिपादन
       चंद्रपूर, दि.2 जानेवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्यावर्षभरात चंद्रपूर जिल्हयाने प्रशासनातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य नागरिकाला प्रशासनाच्या योजना, उपक्रमाचा लाभ मिळत असून   दृष्टीक्षेपात येणारा बदल यावर्षभरात त्यांनी अनुभवला. हॅलो चांदा, संगणक प्रशिक्षण, ट्रकींग डॅशबोर्ड, कुक्कुटपालन क्लस्टर, 99 टक्क्यांवरील शौचालय निर्मिती, विविध आवास योजनेतून घरांची निर्मिती आणि शेतक-यांना महाकर्जमाफीतून मिळालेला दिलासा प्रमुख उपलब्धी ठरल्या आहेत. याशिवाय दारुबंदीची अंमलबजावणी आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा ही गेल्यावर्षीची सिध्दी असून येणा-या वर्षात महाराष्ट्रातील  सर्वोत्तम जिल्हयाचा संकल्प आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी आज पत्रकार परिषदेत  केला.
            महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित “ सिध्दी 2017, संकल्प 2018 ” या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत आशुतोष सलिल यांनी गेल्यावर्षभरातील उपलब्धी व 2018 मधील संकल्पाची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातील या वरिष्ठ अधिका-यांनी यावेळी गेल्यावर्षभरात राज्य शासनांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कॉपीटेबल बुक व जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या तीन वर्षातील उपलब्धीची घडीपुस्तिका संदर्भासाठी देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी प्रशासनाने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे आणि जिल्हयाने विविध योजनांमध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याचे सादरीकरण केले. चंद्रपूर जिल्हयामध्ये विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने जिल्हयातील तीन तालुक्यामध्ये ट्रकींग डॅशबोर्ड ग्रामविकास योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गाव पातळीवरील प्रत्येक घटकाची नोंद घेतली जाते. त्यामुळे कोणती योजना कोणत्या गावामध्ये राबविणे आवश्यक आहे. त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे. याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा यंत्रणेकडे येत आहे. त्यामुळे दूर्गम भागातील सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबतचा रोडमॅप आखण्यामध्ये सुविधा होत असून जिल्हयाच्या नियोजनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. हॅलो चांदा या यशस्वी योजनेच्या कार्य पध्दतीची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर एक हजार आदिवासींच्या जिवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात करणा-या पोंभूर्णा तालुक्यातील कुक्कुटपालन क्लस्टरची यशकथा त्यांनी पत्रकारांना सांगितली. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध बदल व अभिनव संकल्पनांचा झालेला लाभ त्यांनी पत्रकारांपुढे मांडला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर यांनी गेल्या वर्षभरात पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला. चंद्रपूर जिल्हयामध्ये खुनासारख्या मोठया गुन्हयातील सर्व प्रकरणांचा तडा लावण्यात पोलीसांना यश आल्याने या घटकातील शंभर टक्के उपलब्धीचा आढावा त्यांनी मांडला. जिल्हयामध्ये दारुबंदी केल्यानंतर 56 कोटीवर मुद्देमाल जप्त करण्यात वर्षभरात यश आल्याचे त्यांनी सांगितले. 9 हजार 560 आरोपींना या प्रकरणात खटला दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हयामध्ये पोलीसांसाठी मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हयामध्ये स्वच्छ भारत मिशनचे लक्ष 99 टक्क्यांवर पूर्ण झाले असून लवकरच जिल्हा स्वच्छतेमध्ये 100 टक्के यशस्वी झाल्याचे नजीकच्या काळात जाहिर करण्यात येईल, असे सुतोवाच केले. जिल्हयाची मॉडल हेल्थ डिस्ट्रीक्ट म्हणून भारतातून  निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील 1540 शाळा डिजीटल झाल्या असून पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियानामुळे संगणकीय क्षेत्रातील ज्ञानामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकत असल्याचे त्यांनी सांगितले. 2 शाळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी शहराच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये क्रांतीकारी ठरलेली अमृत पाणी पुरवठा योजना व स्वच्छता ॲपची उपलब्धी यावेळी मांडली. जिल्हयामध्ये यावर्षी पाणी उपलब्धता कमी असतांना देखील शहर वाशियांना मुबलक पाणी मिळेल असे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळा सुरु झाल्यानंतरच एक दिवस आड पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत विचार केल्या जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरवितांना अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बाबुपेठ उड्डान पुलासारखा प्रश्न लवकरच निकाली लागणार असून शहरातील प्रमुख चौकांच्या सौंदर्यीकरणातून चंद्रपूरचे रुप पालटणार असल्याचे सांगितले.

2017  मधील जिल्हा प्रशासनातील महत्वाचे निर्णय

·        ‘हॅलो चांदा’, पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेची यशस्वी सुरूवात
·        1800-266-4401 या क्रमांकावर तक्रारीचा ओघ वाढला, प्रशासनाची गती वाढली
·        टाटा ट्रस्टच्या मदतीने जिल्हयातील तीन तालुक्यातील ट्रकींग डॅशबोर्ड ग्राम विकास योजनेला सुरूवात
·        नेमक्या कोणत्या योजना कुठे, किती प्रमाणात आवश्यक आहे याची माहिती मिळायला सुरूवात
·        तीन तालुक्यातील प्रयोगाला लवकरच जिल्हाव्यापी करण्यासाठी सुरूवात करणार
·        जिल्हयात पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियानाला सुरूवात
·        डिजीटल शाळांतील मुलांना/ शिक्षकांना टाटा ट्रस्टच्या मदतीने डिजीटल साक्षरता अभियान
·        38,600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून 942 शाळांमध्ये संगणक असणारी बस भेट देणार आहे.
·        जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना महाकर्जमाफी
·        जिल्हयामध्ये पोंभुर्णा तालुक्यात ‘कुक्कुटपालन क्लस्टर’ तयार करण्यात आले आहे.
·        1 हजार आदिवासी कुटुंबांना पुढील 3 वर्षांसाठी या अभियानामध्ये सहभागी करण्यात आले आहे.
·        आर्थिक सुबत्तेची हमी असून या माध्यमातून नियमित अर्थाजनाची घडी बसवली जाणार आहे.
·        पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्सुअल ओफेन्स ॲक्ट) या मुलांवरील लैगिक अत्याचार प्रतिबंद आयदयाची अंमलबजावणी करणारा पहिला जिल्हा.
·        महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटांच्या सहभागातून जिल्हयात सेतू केंद्राला सुरूवात; महिला सबळीकरणाला चालणा.
·        जिल्हयातील चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे पर्यटनाला चालणा देणारे सुशोभीकरण
·        जिल्हयामध्ये गरजू, होतकरू व अभ्यासू मुलांसाठी अभ्यासाठी व्यवस्था निर्माण करणाऱ्या अभ्यासिकांचे जाळे सुरू
·        प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रेक्षागृहाचे नूतनीकरण आणि या ठिकाणी प्राचीन नाणी संग्रालयाची सुरूवात.

जिल्हा परिषदेमार्फत वर्षभरातील उपलब्धी

·        प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 1282 घरांचे काम पूर्ण. 47.33 कोटी रूपयांतून 7851 घरे बांधण्याचे उद्दिष्टय
·        रमाई आवास योजनेतुन 349 घरे पूर्ण. 10.01 कोटी रूपयातून 1252 घरे बांधण्याचे उद्दिष्टय
·        शबरी आवास योजनेतून 191 घरे पूर्ण. 5 कोटी 63 लक्ष रूपयातून 788 घरांचे उद्दिष्टय.
·        स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 99.94 टक्के वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्टय पूर्ण.
·        99.64 टक्के गावे उघडयावरील शौच मुक्त झाली आहेत.
·        5 पैकी 14 तालुके उघडयावर शौच मुक्त करण्यात आली आहे.
·        जिल्हयात 53 कोटी 31 लक्ष रूपयाचा निधी सिंचन विहिरीसाठी मिळाला असून यातून 3 हजार 614 विहिरींचे निर्माण करण्यात येणार आहे.
·        जलयुक्त शिवार योजनेतून 136 कामे करण्यात येणार असून याव्दारे 1525 हेक्टर संक्षीत सिंचन क्षमता निर्मितीची हमी
·        मामा तलावासाठी 414 कामे मंजूर असून याव्दारे 7 हजार 780 हेक्टर सिंचन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न आहेत.
·        राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत 12 नळ योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
·        जिल्हयात 35 ठिकाणी आरओचे शुध्द पाणी पोहचवण्याचे उदिष्ठय असून 9 ठिकाणी पूर्ण क्षमतेने योजना सुरू झाली आहे.
·        जिल्हयामध्ये 2017-18 साठी जिल्हा प्ररिषदमार्फत 70 कीमी रस्ता निर्मिती केली जाणार आहे.
·        मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत 280 की.मी.काम मंजूर आहेत.
·        जिल्हयात 1540 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत.
·        जिल्हयामध्ये सध्या 2684 अंगणवाडी कार्यरत आहेत.
·        राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत सर्वत निर्देशांकात चंद्रपूर जिल्हयाला प्रथम पुरस्कार.
·        भारतातून मॉडेल हेल्थ डिस्ट्रीक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हयाची निवड.

पोलीस प्रशासनाची वर्षभरातील उपलब्धी

·        जिल्हयातील दारुबंदीनंतर 56 कोटीवर मुद्देमाल जप्त
·        24 कोटी रुपयांची दारु जप्त
·        अवैध दारुची विक्री व वहन करणा-यांवर 9 हजार 50 खटले दाखल 
·        खुनासारख्या गंभीर गुन्हयांचे 100 टक्के तटा
·        नकली ऐटीएम तयार करणा-या आंतरराज्यीय गॅगचा पडदाफाश
·        सायबर क्राईम सेलकडून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयांचा तपास
·        पोलीसांसाठी घरे व नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला गती

महानगरपालिका प्रशासनाची वर्षभरातील उपलब्धी
·        केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत 231 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कार्याला सुरुवात.
·        शहरात 8 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरु
·        अमृत योजनेअंतर्गत मलप्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी महाजनकोला देण्याबाबत प्रकल्प करणार.
·        रामाळा तलावाच्या विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात
·        झरपट नदी विकास कार्यक्रमातंर्गत अंचलेश्वर गेटजवळील सौंदर्यीकरणाला सुरुवात.
·        शहरातील खुल्या जागांचा विकास करणार
·        बाबुपेठ स्टेडीयमचे बांधकाम, कोनेरी स्टेडीयमचे नुतनीकरण करणार.
·        ऊर्जाबचतीसाठी नवे पथदिवे उभारण्याचे काम सुरु
·        नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात कामाला सुरुवात.
                                                            0000

Friday, 8 December 2017

चंद्रपूर आकाशवाणीचा रौप्य महोत्सवाला रंगली गाण्याची मैफल विविध उपक्रमातून वर्धापन दिन साजरा

चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हयामध्ये मनोरंजनासोबत माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या चंद्रपूर आकाशवाणीला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत . मंगळवारी ५ डिसेंबरला एका शानदार सोहळ्यात २५ वर्षाचे सिंहावलकोन करण्यात आले.
        चंद्रपूरमध्ये २५ वर्षापूर्वी दिनांक 6 डीसेंबर 1992 रोजी चंद्रपूर आकाशवाणीच्या प्रसारणाला सुरुवात झाली, आणि बघता बघता हा प्रवास २५ वर्षाचा झाला. वनाच्छादित जिल्हा असणाऱ्या चंदपूरमध्ये एक प्रभावी माध्यमं म्हणून चंद्रपूर आकाशवाणीची ओळख आहे . श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद आणि परस्पर संवादाचे माध्यमं म्हणून चंद्रपूर आकाशवाणीने आपले नावलौकिक मिळवले असून आकाशवाणीचे  मनोरंजनात्मक व विकासवार्तावरील अनेक कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहे . यामध्ये आरोग्य दर्पण, गीत गुंजन, गीत सरिता, आपली आवड, हॅलो सखी, पत्रावर आधारित प्रतिसाद, ओळख कायदयाची, विविध अधिका-याच्या मुलाखती व मान्यवरांच्या आदी कार्यक्रमाचा समावेश आहे.
    चंद्रपूर जिल्हयात लोकप्रिय ठरलेल्या आकाशवाणीची मंगळवारी सायंकाळी संगीत मेजवानीत रौप्य महोत्सवपूर्व सायंकाळ साजरी करण्यात आली  हिंदी -मराठी गाण्यांची ही मैफल साजरी केली हिमांशू रंगारी यांच्या चमूने. यामध्ये  संगीता उमरे, मंगेश देऊळकर, शेखर शर्मा, अमोल दुधकर, निखील जिरकुंटवार, आशिष गायगोले, सुनील इंदू वामन ठाकरे आदी कलाकार सहभागी झाले होते .
     तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार व आकाशवाणीचे जिल्हा वार्ताहर मधुसुदन व्यास , प्रभारी केंद्र प्रमुख मनोहर पवनीकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली . यावेळी आकाशवाणीच्या माध्यमातून एक जागरूक व प्रतिसाद देणारी पिढी आम्ही निर्माण करण्याचे दायित्व या माध्यमाने पार पाडावे. शासकीय योजना आणि धोरण तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरत असून आणखी प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून कार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली . प्रेक्षपणाची फ्रीकवेन्सी वाढवण्यात यावी, तसेच स्थानिक भाषा, स्थानिक समस्या आणि स्थानिक कलाकारांना अधिक वाव मिळावा , अशी मागणीही मान्यवरांनी केली .
      या कार्यक्रमाला आकाशवाणी ,दूरदर्शन  केंद्रातील कर्मचारी  ,नैमितिक उदघोषक, मान्यवर श्रोते उपस्थित होते.
0000000


रोजगार मेळाव्याला शेकडो तरुणांची उपस्थिती नोकरी देणारी पिढी कौशल्य विकासातून मिळेल :महापौर


चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : सर्वांना नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे अगदी छोटया स्तरावर  का  होईना उद्योगधंदा उभारण्यासाठी सुरुवात करा. धडपड कधीच वाया जाणार नाही. कौशल्य विकास देणाऱ्या अभ्यासक्रमाची  निवड करा. असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी  आज  युवकांशी  संवाद  साधताना  केले.
दिनदयाळ अंत्योदय योजना –राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान,चंद्रपूर,जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजिकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जैन भवन येथे या रोजगारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी  विविध  कंपन्याकडून उमेदवारांची मुलाखत व माहिती गोळा करण्यात आली. शेकडो  तरुणांनी संबंधित कंपन्यातील रिक्त जागांसाठी आपली उमेदवारी दाखवली. याठिकाणी विविध प्रशिक्षण संस्थाकडून स्टॉल लावण्यात आले होते. याशिवाय मुद्रा बॅक, विविध महामंडळ व लोकराज्यचा  स्टॉल लावण्यात आला होता.  
या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, एमआयडीसी  इंड्रस्ट्रीज असोशिशनचे अध्यक्ष  मधुसूदन रुघटा  यांच्या  सह उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी  समिती  सभापती  राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपआयुक्त विजय देवळीकर, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास सुनंदा बजाज, चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिघवी, गोपाल एकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानावरून बोलतांना एमआयडीसी  इंडस्ट्रीज असोशिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंघटा  यांनी व्यावसायिक होण्यासाठी सचोटी व  मेहनतीसोबत  एक पाऊल पुढे टाकण्यासाठी  हिम्मतही आवश्यक  असल्याचे सांगीतले. श्रीमती सुनंदा बजाज यांनी यावेळी कौशल्य विकास विभागाबाबत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या रोजगार मेळाव्याला जिल्हा  भरातील तरुणांनी  उपास्थिती  लावली  होती.

0000000

Wednesday, 29 November 2017

उदयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचनाला वेळ दया -- कल्पना निळ



साहित्य, कला, संस्कृतीचा ग्रंथोत्सव थाटात संपन्न

चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर – चंद्रपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून साहित्य, कला, संस्कृती आणि वाचन चळवळीला उजागर करणा-या ग्रंथोत्सवाचा आज समारोप झाला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने व सहभागाने गाजलेल्या या संमेलनातून वाचन संस्कृतीला बळकटी आणण्याचा संदेश दिला गेला. ‘उदयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन ही गुंतवणूक असल्याचा’, सल्ला उपजिल्हाधिकारी कल्पना निळ यांनी समारोपाच्या कार्यक्रमात गुणवंताना दिला.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद चंद्रपूर, चंद्रपूर माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 28 व 29 नोव्हेंबर या काळात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा वाचन संस्कृतीला बळकटी देणारा समारंभ पारपडला. वाचनाचे विविध अंग म्हणून पुढे आलेल्या व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, वादविवाद, विविध कलागुणांना सादर करण्याची संधी या ग्रंथोत्सवातून देण्यात आली. 28 तारखेला ग्रंथदिंडीने जनजागरण करणा-या या ग्रंथोत्सवाला उत्तोरत्तर चांगल्या कार्यक्रमांनी रंगत भरल्या गेली. ग्रंथोत्सवा दरम्यान झालेल्या परिसंवादामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सिटी कन्या विद्यालयाच्या मानसी विश्वकर्मा प्रथम तर ज्युबली हायस्कुलची जेबा सेल्‍वीम व्दितीय ठरली. या परिसंवादचे अध्यक्ष सुरेश चोपणे होते. 13 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कवी संमेलनामध्ये लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुलींनी आपले वर्चस्व नोंदविले. यामध्ये स्मृध्दी आगलावे व मेहवीश शेख या मुलींनी प्रथम व व्दितीय क्रमांक घेतला. या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख होते. 15 विद्यार्थी कवीनी आपल्या रचना सादर केल्या. व्याख्यानाच्या आजच्या पहिल्या सत्रात श्री.प्र.ग.तल्लवार यांच्या अध्यक्षतेत डॉ.पद्मरेखा धनकर, प्रा.अशोक माथनकर यांनी वाचन संस्कृती आणि ग्रंथालय या विषयावर मंथन केले. या सत्राचे सूत्र संचालन अनिता अडबले यांनी केले. कथाकथनामध्ये 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कथाकथनामध्ये भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या प्रणय उपरे यांनी प्रथम तर प्रियदर्शनी लधवे व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. शिक्षकांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी होते. 13 शिक्षकांनी यावेळी कवीता सादर केल्या. या सत्राचे संचालन भागवतकर यांनी केले. शिक्षकांच्या कवी संमेलनात महात्मा कनिष्ठ महाविद्यालयाचे राहूल दहिवले यांची कवीता उल्लेखनिय ठरली. वादविवाद स्पर्धेमध्ये 18 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्रध्दा खनके व पलक खसारे या विद्यार्थींनी सूत्र संचालन केले. वादविवाद स्पर्धेमध्ये लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची वैष्णवी चिंचोळकर, सिटी कन्या विद्यालयाची दिक्षा चौधरी प्रथम व व्दितीय ठरली.
ग्रंथदिंडी आयोजनाचा प्रभार सुदर्शन बारापात्रे, किरण पराते, किरण कात्रोजवार, संजय अंडूसकर यांनी घेतला. तर जिल्हा परिषद ज्युबली हायस्कूलच्या स्वर्गीता खंडाळे, कादंबी ठेमस्कर यांनी रांगोळी रेखाटून संमलेनाची रंगत वाढविली.
समारोपाच्या कार्यक्रमामध्ये उपजिल्हाधिकारी कल्पना निळ यांनी सन 2016-17 मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभ्यास करुन वेगवेगळया शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या 23 स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना त्यांनी वाचन ही गुंतवणूक असून विद्यार्थी दशेमध्ये केलेली मेहनत आयुष्य घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनासाठीच्या वेळेचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, जिल्हा ग्रंथपाल आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके होते. या समारोपीय समारंभाचे सूत्र संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. यावेळी ग्रंथोत्सवाला यशस्वी करण्यासाठी कार्य केलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

000