Search This Blog

Saturday, 1 February 2025

जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीकरीता प्रयत्न करणार





 जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीकरीता प्रयत्न करणार

Ø पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

चंद्रपूरदि.1 : सन 2025-26 करीता शासनाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी 340 कोटी 88 लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर केला असला, तरी यात वाढ करून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेकरीता 640 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत 100 कोटी तर आदिवासी उपयोजना अंतर्गत 200 कोटी रुपये, असे एकत्रित  940 कोटी रुपयांच्या वाढीव प्रस्तावाची मागणी राज्यस्तरीय बैठकीत केली जाईल. जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

नियोजन सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, प्रभारी मुख्य वनसंरक्षक पियुषा जगताप, जिल्हा नियेाजन अधिकारी संजय कडू  व विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेची कमाल वित्तीय मर्यादा 340 कोटी 88 लक्ष रुपये ठेवली आहे. यात 300 कोटींची वाढ करून 640 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना करीता असलेल्या 75 कोटीमध्ये 25 कोटींची वाढ करून 100 कोटी रुपये तर आदिवासी उपयोजनेकरीता असलेल्या 111 कोटींमध्ये 89 कोटींची वाढ करून 200 कोटी रुपये असे एकूण 940 कोटींची मागणी करण्यात येईल. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणांची एकूण मागणी 1059 कोटींची आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जे अधिकारी विनापरवानगी गैरहजर असतील त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मामा तलावाच्या दुरुस्तीकरणासाठी स्वतंत्र निधी देण्याबाबत शासन निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच अनेक गावांमध्ये स्मशानभुमी शेड, स्मशानभुमी पोहच रस्ते नसल्याने ही कामे प्राधान्याने घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. हर घर जल योजनेचे काम त्वरीत पूर्ण करावे. तसेच मागणी असेल तेथे महावितरण कंपनीने ट्रान्सफार्मर उपलब्ध करून द्यावे. सर्व आमदारांच्या सुचना लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी वाढीव निधीची तरतूद राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

विविध बाबींसाठी राखीव निधी : जिल्ह्यातील एकूण नियतव्ययाच्या, महिला व बालकल्याण विभागासाठी 3 टक्के राखीव निधी, गतिमान प्रशासन अंतर्गत 5 टक्के राखीव निधी, शिक्षण अंतर्गत 5 टक्के राखीव निधी, पर्यटन व गडकिल्ले अंतर्गत 3 टक्के राखीव निधी, गृह विभाग अंतर्गत 3 टक्के राखीव निधी तर शाश्वत विकास ध्येय करीता 1 टक्का राखीव निधी ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

०००००००

बचत गटाच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर - पालकमंत्री डॉ. अशोक उईके








 

बचत गटाच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Ø जिल्हास्तरीय हिराई व मिनी सारस महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 1 चंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटांचे अतिशय उत्तम काम आहे. या बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद विविध उपक्रम राबवित आहे. अशा उपक्रमातूनच महिला आत्मनिर्भर होण्यास हातभार लागणार असून पंतप्रधानांच्या विकसीत भारत संकल्पनेत चंद्रपूरचे निश्चितच योगदान राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाउमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानेमहिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीकरीता चांदा क्लब ग्राऊंडयेथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करतांन पालकमंत्री डॉ. अशोक उईके बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, प्रभारी मुख्य वनसंरक्षक पियुषा जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, गिरीश धायगुडे, नुतन सावंत उपस्थित होते.

देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम प्रशासनाने आयोजित केला असून जिल्ह्यात महिला बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले असून त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेले हे एक पाऊल आाहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा सर्वांगीन विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. महिलांच्या कोणत्याही तक्रारी किंवा अडीअडचणी असतील तर प्रशासनाने त्या त्वरीत सोडवाव्यात. महिलांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे महिला ग्रामसंघ, लखपती दिदी योजनेंतर्गत महिलांचा सन्मान, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी विविध स्टॉल तसेच पशुप्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते बचत गटाच्या व्यापारी संकुलाचे ई-भुमीपुजन करण्यात आले.

प्रास्ताविकेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, पाच दिवसीय या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल, आरोग्य तपासणी, महिलांची कॅन्सर तपासणी, पशुप्रदर्शनी, विविध येाजनांची माहिती देणारे स्टॉल आदी लावण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात महिला बचत गटांना आतापर्यंत 362 कोटींचे वाटप करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख, गटविकास अधिकारी तसेच मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध : प्रदर्शनीमध्ये विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचेविविध प्रकारच्या चटण्याकडधान्यमसाल्याचे पदार्थखाद्यपदार्थलांबपोळीपुरणपोळीझुनका भाकरमोहाची भाकरजवस चटण्यामातीचे भांडेलोकरी वस्तुलाकडी शिल्पशोभीवंत वस्तूहातसळीचे तांदूळकापडी बॅगटेराकोटागांडूळखत आदींचा समावेश आहे.

००००००

सांघिक भावना वाढीसाठी खेळ महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी विनय गौडा






 सांघिक भावना वाढीसाठी खेळ महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

चंद्रपूरदि.1 : अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रकारचे कलागुण व कौशल्य असतात. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून हे कलागुण व कौशल्य दाखविण्यासाठी मंच उपलब्ध होत असतो. अशा स्पर्धांमधून अधिकारी व कर्मचारी एकत्रित आल्याने सांघिक भावना वाढण्यास मदत होत असून त्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले. जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्रागोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुरपरीविक्षाधीन जिल्हाधिकारी कश्मीरा संख्येनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाळेउपजिल्हाधिकारी शुभम दांडेकरराजूराचे उपविभागीय अधिकारी  रवींद्र मानेमूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडेउपविभागीय अधिकारी संजय पवार तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेजिल्हा महसूल व क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कलागुण आणि विशेष कौशल्य दाखविण्यासाठी मंच मिळतो. स्पर्धेच्या माध्यमातून संघ भावना वाढीस लागते. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे व आपल्या अंगी असणारे कौशल्य दाखवावे. पुढील आठवड्यांमध्ये विभागीय स्पर्धा होणार असून त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य  चांगले राखण्यास मदत मिळते.

प्रस्ताविकेत बोलतानासीमा गजभिये म्हणाल्यावर्षभर कार्यालयीन कामकाजामध्ये सतत व्यस्त असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून या क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असणार आहे. तत्पूर्वीजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात 100 मीटर धावणे या क्रीडा खेळाने करण्यात आली.

००००००