पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 198 उमेदवारांची प्राथमिक निवड
चंद्रपूर, दि.14 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर, सर्वोदय महाविद्यालय आणि ओ.बी.सी, एस.सी.एस.टी क्रांतीदल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 198 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतूराज सुर्य तर अध्यक्षस्थानी सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश डहारे व प्रमुख अतिथी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राजु नंदनवार, राजेंद्र महाडोळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे आदी उपस्थित होते.
राजेश डहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून, उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या कुटंबाला आर्थिक हातभार लावावा. राजू नंदनवार यांनी बॅंकेचे कर्ज विषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राजेंद्र महाडोळे यांनी आपल्या भाषणातून, सिंदेवाही परिसरात सदर रोजगार मेळावा पहिल्यांदाच होत असून आपल्या परिसरातील सुशिक्षित उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचा तसेच शैक्षणिक अर्हतेचा वापर करून जास्तीत जास्त उमेदवारांनी आस्थापनामध्ये रूजू व्हावे. तसेच जे उमेदवार स्वयंरोगार करण्यास इच्छूक असतील त्यांनी शासनाच्या विविध महामंडळातून कर्ज उचलून उद्योग सुरु करावे, असे आवाहन केले.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद जैस्वाल यांनी सांगितले की, महाविद्यालयीन उमेदवारांनी विविध कौशल्य आत्मसात करून छोटे मोठे उद्योग सुरू करावे. त्यातून भांडवल उभे करून उद्योजक बनण्याकरीता प्रयत्न करावे. प्रास्ताविकात सहायक आयुक्त भैयाजी येरमे म्हणाले, जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार / स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा व उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी.
सदर रोगजार मेळाव्यात मिटकॉन कोरम नागपूर, हल्दिराम प्रा.लि. नागपूर, विदर्भ क्लिक वन सोल्यूशन चंद्रपूर, डिस्कॉन प्रा. लि. नागपूर, प्रथम एज्यूकेशन फाऊंडेशन मुंबई, संजिवनी महानंदा आयुर्वेद कंपनी ,गडचिरोली इत्यादी नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सदर रोजगार मेळाव्यात 360 उमेदवार सहभागी होते. त्यापैकी 198 उमेदवारांचे प्राथमिक निवड झाली आहे.
०००००
No comments:
Post a Comment