Search This Blog

Saturday, 8 February 2025

शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अधिका-यांचा मुक्काम





 

शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अधिका-यांचा मुक्काम

Ø ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेची पाहणी

चंद्रपूर, दि. 08 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून 7 फेब्रवारी रोजी राबविण्यात आलेल्या ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही वरिष्ठ अधिका-यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आश्रमशाळा तसेच वसतीगृहाची पाहणी केली.

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा कार्यान्वित आहे. या आश्रमशाळा व वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 रोजी ‘संवाद चिमुकल्यांशी’ हे अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललितकुमार व-हाडे यांनी राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि विशेष कार्य अधिकारी श्री. वाडेकर यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला.

खाजगी सचिव ललितकुमार व-हाडे यांनी देवाडा येथील आश्रमशाळेत इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच वर्गखोल्यामुलांचे - मुलींचे वसतीगृह, भंडारगृह, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह ग्रंथालय, अभ्यासिका, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान आणि परिसराची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी मुलांच्या पंगतीमध्ये जेवण वाढले आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादसुध्दा घेतला. समोरच असणाऱ्या आदिवासी विभागाच्या एकलव्य नामांकित शाळेला श्री. व-हाडे यांनी भेट देऊन पाहणी केली

आगामी 10 वी आणि 12 वी परिक्षेच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना श्री. व-हाडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून आपली प्रगती करा. तसेच आपल्यातील कलागुणांना विकसीत करून एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करून शाळेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांना केले. त्यावेळी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी नृत्य सादर केले सादर केले.

प्रकल्प अधिकाऱ्यांचा पाटण येथील आश्रमशाळेत मुक्काम : ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमाअंतर्गत 7 फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटणयेथे एकदिवस मुक्काम केला. सकाळी शाळेच्या परिपाठापासून ते रात्री मुलांच्या अभ्यासापर्यंत संपूर्ण एक दिवस विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच शाळेतील इतर मुलभूत सुविधांची पाहणी केली. त्याच बरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शक्य ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांनी दुपार व सायंकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतला.

००००००

No comments:

Post a Comment