विशेष लेख :
मराठी भाषा संवर्धन विषयी 'चला बोलू काही'
चंद्रपूर : लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
जगामध्ये अनेक भाषा आहेत; परंतु मी ज्या मातीत जन्मले, त्या मातीची भाषा मराठी आहे आणि म्हणूनच मला मराठी भाषेचा सार्थ अभिमानही आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी बोलणाऱ्यांची एकूण संख्या ९ कोटी आहे. मराठी भाषेची निर्मिती ही संस्कृत व प्राकृत या भाषांच्या अपभ्रंशामधून झाली आहे. महाराष्ट्र व गोवा या राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा असून ती जगातील १५ वी व भारतातील चौथी भाषा आहे.
'माझ्या मराठाची बोलू कवतिके! परी अमृतातेही पैजा जिंके! ऐसी अक्षरेची रसिके! मेळविण!
अशी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली आणि आज खऱ्या अर्थाने ती प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली. कारण मराठी संतांच्या, माणसाच्या अथक प्रयत्नांचे, हजारो वर्षांचे हे फलित आहे की, ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी केंद्र सरकारच्या पुढाकाराने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि समस्त मराठी जणांची मान अभिमानाने उंचावली. हा लढा सोपा नव्हता. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पंधराशे ते दोन हजार वर्षे जुना भाषेचा पुरावा देण्यात आला. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेले योगदान, या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात यश आले. हा मिळालेला अभिमान टिकवणे केवळ सरकारचे काम नसून तिला जगात सर्वदूर पसरवणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा विभाग दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत असते. तसेच दरवर्षी विश्व साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. मराठी भाषा दिवस आपण दरवर्षी साजरा करत असतो. कुठलाही दिवस साजरा करणं खूप सोपं असतं; परंतु खरोखर आपण आपली मातृभाषा टिकावी म्हणून आपण काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते प्रयत्न करायला हवेत?
मराठीत एक खूप सुंदर अशी म्हण आहे. ' जिथे पिकते तिथे विकत नाही ' खरेच आहे. आपण महाराष्ट्रात राहतो; परंतु आपल्याला त्याचा अभिमान खरेच आहे काय? जसे आईसमोर असताना आईचे महत्त्व कळत नाही; परंतु तुम्ही आईपासुन जेवढे लांब जाल तेवढे तिचे नसण्याचे चटके आपल्याला जाणवतात. अगदी त्याचप्रमाणे मराठी भाषेचे आहे. परप्रांतात गेल्यानंतर मराठी भाषिक लोकांविषयी जेवढी ओढ आपल्याला वाटते, तेवढी दुसऱ्या भाषांविषयी वाटत नाही.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच, अमरावती 'रिद्धपूर' येथे पहिले मराठी भाषा विद्यापीठ सुरू झाले. या विद्यापीठातून मराठीला अधिक कसे समृद्ध करता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न होतीलच, पण मराठी भाषेचे महत्व सगळ्यांना जाणवायला पाहिजे. आज व्यापारीकदृष्ट्या सुद्धा मराठी भाषा खूप महत्त्वाची झालेली आपल्याला दिसून येते. चीन सारख्या देशाला महाराष्ट्रातील मराठी भाषेचे वेड लागलेले आहे. कारण त्यांना येथे त्यांचा व्यापार वाढवायचा आहे आणि म्हणूनच ते इथे येऊन मराठी भाषा शिकतात. तसेच त्यांच्या देशात सुद्धा त्यांना मराठीचे धडे गिरवले जात असतात. अमेरिका किंवा इतर युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा मराठी भाषा शिकवल्या जाते. परंतु आपल्याच भारतातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे वेड लागले. पालकसुद्धा घरात मुलांसोबत इंग्रजी बोलण्याचा अट्टाहास करतात. इंग्रजी ही काळाची गरज असली तरी ती शिकण्यात काहीही वावगं नाही; परंतु मराठी माणसाने प्रत्येक गोष्टीमध्ये इंग्रजीचा अनिवार्य वापर टाळला पाहिजे. घरात, दारात, बाजारात इकडे-तिकडे, सगळीकडे मराठीचा जेवढा जास्त मोठ्या प्रमाणात वापर करता येईल, तो केला गेला पाहिजे. तेव्हाच आपण मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवू शकू.
मराठी भाषा ही प्रत्येक १२ कोसावर बदलताना दिसते. त्यात कोकणी, वऱ्हाडी, अहिराणी यासारख्या अनेक विविध प्रकारात ती विभागलेली दिसते. तिचा गोडवा, तिची लयबद्धता दुसऱ्या कुठल्याच लिपीत किंवा भाषेत जाणवत नाही. अशा या भाषेतली लवचिकता पालकांनी, शिक्षकांनी तसेच प्रत्येक मराठी माणसाने जपायला हवी. स्वतःच्या जीवा इतकेच तिलासुद्धा महत्त्व द्यायला हवे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा मागे पडता कामा नये, असे जर प्रत्येकाला वाटत असेल तर कुणाला मेसेज करताना, पत्र व्यवहार करताना तसेच दैनंदिन जीवनात तिचा वापर वाढवायला हवा. तिला साहित्याच्या माध्यमातून, संमेलनाच्या माध्यमातून तसेच सर्वच स्तरावर तिचा वापर वाढवायला हवा, बालवयातच बालकांना मराठीचे बाळकडू देण्यात यायला हवे. इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणायला हवे.तसेच उत्तम भाषांतर कार मराठीत निर्माण होणे काळाची गरजच आहे.
सौ. रचना पंकज धोटे.
०००००००
No comments:
Post a Comment