Search This Blog

Wednesday, 12 February 2025

पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी परीक्षा केंद्रावर






 पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी परीक्षा केंद्रावर

Ø कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हास्तरीय 8 भरारी पथक

चंद्रपूर, दि. 12 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून जिल्ह्यातील एकूण 87 केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशीच दिवशी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास (203) भेट दिली. तसेच परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, परीक्षा केंद्र परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे सुरू असावेत. महाविद्यालयाच्या परिसरात परिक्षेच्या संबंधित व्यक्ती व्यतिरिक्त कुणीही अन्य व्यक्तीस प्रवेश देऊ नये. प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी प्रवेश द्वारावर विद्यार्थ्यांची योग्य तपासणी करण्यात यावी. तसेच महाविद्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद आहेत, याची खात्री करून घ्यावी. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावेळेस केद्र संचालक महेश मालेकर, उपकेंद्र संचालक राहूल मानकर व बैठेपथक मधील डी.एस. मोहूर्ले आदी उपस्थित होते.

इयत्ता 12 वी ची परिक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च तर इयत्ता 10 वी ची परिक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता 12 वीचे एकूण 28303 परिक्षार्थी आहेत. तर इयत्ता 10 वीच्या परिक्षार्थींची एकूण संख्या 28174 आहे. 12 वी करीता जिल्ह्यात 87 परीक्षा केंद्र आणि 10 वीच्या परिक्षेकरीता 125 परीक्षा केंद्र आहेत. कॉपीमुक्त परिक्षेसाठी जिल्हास्तरावर 8 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 3 सदस्यांचे बैठक पथकही ठेवण्यात आले आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ची नजर राहणार आहे. सोबतच परिक्षेकरीता कार्यरत पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment