पायाभूत सुविधांसाठी आता 10 लाखांचे अनुदान
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 फेब्रु. 2025
चंद्रपूर, दि. 19 : अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य प्राप्त खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांसाठी आता 2 लाखाऐवजी 10 लाखांचे अनुदान मिळणार आहे. सन 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठी इच्छुक शाळांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2025 आहे.
भारत सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने अल्पसंख्यांक समुदायासाठी पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. या योजनेच्या 15 उद्दिष्टांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, अल्पसंख्यांक समुदायाचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी उपाययोजना करणे, अशा स्वरूपाची उद्दिष्टे निश्चित केली आहे.
तसेच केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, अल्पसंख्यांक समुदायास केंद्र शासनाच्या इतर विविध कल्याणकारी योजनांचा, जसे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्यांक शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, अल्पसंख्यांक बहुल शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विद्युत व्यवस्थेअभावी खंड पडू नये म्हणून जनरेटरची सुविधा निर्माण करणे, या योजनांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
तरी अल्पसंख्यांक शाळांकडून सन 2024- 25 या आर्थिक वर्षात शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2015 मध्ये नमूद करण्यात आलेल्या 12 पायाभूत सुविधांपैकी वरील दोन पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांचा उल्लेख आवर्जून करावा. तसेच इतर आवश्यक सोयीसुविधांकरिता 10 लाखापर्यंत अनुदानाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावे. यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment