Search This Blog

Thursday, 6 February 2025

घरोघरी औषध घेऊन येणा-या आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

 

घरोघरी औषध घेऊन येणा-या आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø हिवताप सार्वत्रिक औषधोपचार मोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम

चंद्रपूरदि 06 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम व टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आरोग्य कर्मचा-यांमार्फत घरोघरी मोफत औषध वितरीत करण्यात येणार आहे. आपल्या घरी येणा-या आरोग्य अधिकारी – कर्मचा-यांना सहकार्य करून सदर मोहीम 100 टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विषयक मोहिमांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविणे तसेच हत्तीरोग दूरीकरणासाठी या मोहिमेत लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. हत्तीपाय झाल्यास उपचार होणे शक्य नसल्यामुळे सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेदरम्यान आपल्याकडे येणाऱ्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक गोळ्या त्यांच्या समोरच खाव्यात व स्वत:ला या आजारापासून दूर ठेवावे.

पुढे ते म्हणाले, 100 दिवस क्षयरोग मोहीम राबविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचा-यांना सर्वतोपरी सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी. तसेच क्षयरोगावर औषध उपचार घेत असलेले रुग्णांना दानशूर नागरिकांनी पोषण आधार किट देऊन निक्षयमित्र बनण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

प्रत्येक घरात मोफत औषध वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोग ही गंभीर आरोग्य समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृतीअपंगत्व असे गंभीर परिणाम दिसून येतात. हत्तीरोग दूरीकरण मोहिमेंतर्गत तीन औषधांची एकत्रित एक मात्रा देण्यात येणार आहे. यातील आयव्हरमेक्टीन ही गोळी ऊंची नुसार तर डी.ई.सी. व अलबेंडाझोल ही गोळी वयोगटानुसार एक मात्रा घेवून या रोगाचा समूळ नाश करता येते. हत्तीरोगाचे तीनही औषध प्रत्येक घरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मोफत देण्यात येणार आहे. 2 वर्षापेक्षा कमी वयाचे बालकेगरोदर माता  तसेच गंभीर आजारी रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम : टीबी मुक्त भारत अभियानअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 100 दिवस क्षयरोग मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हयामध्ये 7 डिसेंबर 2024  पासून 100 दिवस क्षयरोग मोहीम सुरू आहे. मोहिमेदरम्यान क्षयरोगासाठी जोखीमेचे असलेले 4 लक्ष 7 हजार 325 व्यक्तींची क्षयरोगाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. आजपर्यंत 2 लक्ष 51 हजार 158 व्यक्तींची क्षयरोगाबाबत तपासणी झाली आहे. 10615 व्यक्तीचे छातीचे क्ष-किरण, 7332 व्यक्तीचे नाट तपासणी व 4776 व्यक्तिंची माइक्रोस्कोपी  तपासणी करण्यात आली आहे. मोहिमेदरम्यान 1803 निक्षय शिबीर आजपर्यंत घेण्यात आले  असून 32878 संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून 728  क्षयरुग्णाचे निदान करण्यात आले आहे व त्यांना औषधोपपचार सुरु करण्यात आला आहे.

०००००

No comments:

Post a Comment