वरोरा येथे टीबी फोरम समितीची सभा
चंद्रपूर, दि. 25 : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत वरोरा येथे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली टीबी फोरम कमिटी गठीत करण्यात आली. तसेच पंचायत समिती सभागृहात या समितीची सभा पार पडली.
यावेळी सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, होते, बाळू भोयर, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. विशाल लेडे, डॉ. सुरज हिवरकर, उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकिब शेख, प्रा. राहुल राखे, प्रा. डोंगरे, खाजगी औषधालयचे प्रतिनिधी श्री. तोटावार, श्री. पारखी, आरोग्य सहायक श्री. येडे आदी उपस्थित होते.
डॉ. बोरकर यांनी क्षयरोगाचे लक्षणे, निदान, उपचार याबाबत तसेच क्षयरोगाकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. यात वरोरा तालुक्यात 27 ग्रामपंचायतींची टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे. तालुक्यात सध्यस्थितीत 86 क्षयरोग रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात 7 डिसेंबर 2024 पासून 100 डेज टीबी मोहीम सुरू आहे, सदर मोहिमेंतर्गत जोखीमग्रस्त लोकांचे छातीचे एक्स-रे करण्यात येत आहेत. तसेच लक्षणे असलेल्या लोकांची थुंकी, नमुन्याची तपासणी, सीबीन्याट (CBNAAT) टेस्ट द्वारे केली जाते. या अंतर्गत 2227 लोकांची तपासणी झाली असून 1482 लोकांचे छातीचे एक्स-रे काढण्यात आले व 474 लोकांची सीबीन्याट तपासणी करण्यात आल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षय रुग्णांना 6 महिन्यांकरिता पोषण आहार कीट वाटप करण्यात येते. या कीटमध्ये दर महिन्याला 3 किलो गहू किंवा तांदूळ, दीड किलो तूर डाळ, 1 लिटर खाण्याचे तेल, 1 किलो शेंगदाणे व इतर प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थांचा समावेश केल्या जातो. सदर पोषनाहार कीट सेवाभावी संस्था, राजकीय व्यक्ती, समाजसेवक, खाजगी उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांना दत्तक घेऊन दिल्या जाते. वरोराचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी 5 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार कीटचे वाटप केले. इरतही दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन आहाराची किट वेळेवर द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
०००००
No comments:
Post a Comment