सांघिक भावना वाढीसाठी खेळ महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ
चंद्रपूर, दि.1 : अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रकारचे कलागुण व कौशल्य असतात. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून हे कलागुण व कौशल्य दाखविण्यासाठी मंच उपलब्ध होत असतो. अशा स्पर्धांमधून अधिकारी व कर्मचारी एकत्रित आल्याने सांघिक भावना वाढण्यास मदत होत असून त्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले. जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्रा, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुर, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी कश्मीरा संख्ये, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाळे, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, राजूराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हा महसूल व क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कलागुण आणि विशेष कौशल्य दाखविण्यासाठी मंच मिळतो. स्पर्धेच्या माध्यमातून संघ भावना वाढीस लागते. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे व आपल्या अंगी असणारे कौशल्य दाखवावे. पुढील आठवड्यांमध्ये विभागीय स्पर्धा होणार असून त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते.
प्रस्ताविकेत बोलताना, सीमा गजभिये म्हणाल्या, वर्षभर कार्यालयीन कामकाजामध्ये सतत व्यस्त असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून या क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असणार आहे. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात 100 मीटर धावणे या क्रीडा खेळाने करण्यात आली.
००००००
No comments:
Post a Comment