जिल्हास्तरीय एक दिवसीय सिकलसेल प्रशिक्षण
चंद्रपूर, दि.28 : राष्ट्रीय सिकलसेल आजार निर्मूलन मिशन अंतर्गत जनसामान्यांना सिकलसेल आजाराबाबत अचुक माहिती, रोगाची लक्षणे, निदान, उपचार, गैरसमजुती, आजाराचा प्रसार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, समुपदेशन व जनजागृती होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विलास दुधपचारे, डॉ.बंडू रामटेके, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. प्रसाद पोटदुखे, अश्विनी खोब्रागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाल्यानंतर तालुका स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावपातळीवरील कर्मचारी त्यात आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविकांचेही सिकलसेल आजाराबाबतचे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती सिकलसेल कार्यक्रम अधिकारी संतोष चात्रेशवार यांनी दिली. तसेच जिल्हयातील या आजाराची स्थिती काय आहे व सिकलसेल रुग्णांकरिता शासनाच्या सोईसुविधा याबाबत त्यांनी सांगितले.
केंद्र शासनामार्फत सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाचा राष्ट्रीय कार्यक्रमात अंतर्भाव झाला आहे. सिकलसेल नियत्रंण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांना एकत्रितरित्या काम करून सिकलसेल आजारावर 2047 पूर्वी मात करण्याचे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. सिकलसेल निदानासाठीच्या तपासण्या करणे, उपचार करणे व आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आणि या उपाययोजना ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागांपर्यत योग्य रितीने राबविण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर समित्या गठित करून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनामार्फत कळविण्यात आले आहे.
नवनवीन तंत्रज्ञानाचा केला जाणार अवलंब : लोकांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, मोफत समुपदेशन, तपासणी, उपचार व प्रतिबंध याबाबत एकत्रितरित्या कार्य करून सिकलसेल रुग्णांना गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याबाबत औषधोपचार करणे, प्रसूतिपूर्व गर्भजल तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे व समाजातील सिकलसेल रुग्णांचा प्रसार थांबविणे, सिकलसेल आजाराचे धोरण ठरविणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यासाठी तांत्रिक मदत करणे अशा विविध बाबींचा आढावा घेऊन नवनीवन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. सरिता हजारे यांनी उपचार व गैरसमजुती या विषयावर मागदर्शन केले. डॉ. स्वप्नील चांदेकर, बालरोगतज्ञ डॉ. प्रणाली ठोंबरे, फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, स्त्रीरेागतज्ञ डॉ. शिल्पा नाईक, यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. नेस्को संस्थेच्या कु अश्विणी खोब्रागडे यांनी सिकलसेल आजारामुळे होणाऱ्या वेदना व उपचारांबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन संतोष चात्रेशवार यांनी केले. यावेळी जिल्हा सिकलसेल समन्वयक, समुपदेशक भारती तितरे, राम बारसागडे, नयना चौके, शितल राजपुरे आदी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment