तंबाखू नियंत्रणासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना
त्वरित मोहीम सुरू करायच्या सूचना
चंद्रपूर, दि. 18 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. सभागृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश चिंचोळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर आदी उपस्थित होते.
यावेळी तंबाखू प्रतिबंधक उपाययोजना बाबत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागातर्फे सन २०२४–२५ मध्ये एकूण 8678 नागरिकांचे आरोग्य संस्थेतील तंबाखू मुक्ती केंद्रात समुपदेशन करण्यात आले. विभागतर्फे प्रत्येक ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय स्तरावर तंबाखू मुक्ती केंद्र स्थापित करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा पुरेपूर उपयोग घ्यावा, असे बैठकीत सांगण्यात आले.
तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणाम बाबत अवगत करावे, तसेच शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे, याबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. कोटपा कायदा ६ ब चे उल्लंघन ज्या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात होत आहे, असे सर्व पानठेले त्वरित जप्त करण्याचे व आरोग्य विभाग, महानगरपालिका, पोलीस विभाग, अन्न व औषधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मोहीम काढावी. तसेच अनधिकृतरित्या सुरू असलेल्या पानठेल्यांवर त्वरित कारवाई करावी याच्या सूचना मनपाला दिल्या. मागील वर्षभरात चंद्रपूर शहराचा आकडा बघता एकूण 30 मौखिक कर्करोग रुग्ण चंद्रपूर शहरात आढळले. ज्यामध्ये तीस वर्षावरील व तीस वर्षाखालील अशा दोन्ही रुग्णांचा समावेश आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारा पासून नागरिकांना सतर्क करण्याकरिता शहरातील विविध ठिकाणी दर्शनीय भागात जनजागृतीपर बॅनर लावावे. युवा पिढी कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडत आहे, याबाबत जनजागृती करून नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या.
दरम्यान सिगरेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम कायदा (कोटपा) 2003 विविध कलमा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सण 2024 –25 मध्ये 697नागरिकांकडून 69 हजार 977 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस विभागाच्या वतीने 617 प्रकरणांमध्ये 1 लक्ष 24 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. अन्न व औषधी प्रशासन विभागामार्फत 6 प्रकरणांमध्ये 330.275 किलो साठा 4 लक्ष, 81 हजार 110 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. आरोग्य विभागामार्फत सन 2024,- 25 मध्ये 232 शाळा तंबाखमुक्त करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
००००००
No comments:
Post a Comment