Search This Blog

Wednesday, 18 June 2025

10 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करा


 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करा

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला हरित महाराष्ट्रसमृध्द महाराष्ट्र अभियानचा आढावा

चंद्रपूरदि. 18 : राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ हे अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. या अंतर्गत वर्ष 2025 मध्ये राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. या अभियानाच्या पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी आढावा घेतला. तसेच सदर अभियान यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी बापु येलके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मिलिंद रामटेके आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात 42 टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत आणखी वृक्ष लागवड करायची आहे. वन, कृषी, ग्रामविकास, शालेय शिक्षण या विभागांनी जास्तीत जास्त उद्दिष्ट घ्यावे. तसेच इतरही विभागांनी यात चांगले योगदान देऊन ही मोहीम यशस्वी करावी. वृक्ष लागवडीकरीता रोपे कुठून उपलब्ध होऊ शकतात, त्याचे सुक्ष्म नियोजन संबंधित विभागाने करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वृक्ष लागवडीची आवश्यकता : राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आणि वनाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वनाच्छादनाचे प्रमाण 21.25 टक्के आहे. जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतुबदलाची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

००००००

No comments:

Post a Comment