जिल्हाधिका-यांकडून अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा
Ø नियमित तपासणी करण्याच्या सुचना
चंद्रपूर, दि. 14 जून : अन्न सुरक्षा मानदे कायदा – 2006 ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे गठण करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेऊन नियमित तपासणी करण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण उमप, पोलिस उपअधिक्षक (गृह) योगेश्वर पारधी, उपसंचालक (कृषी) चंद्रकांत ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी.के. खरमाटे, शिक्षण विभागाच्या अर्चना मासीरकर, अन्न पदार्थ व्यावसायिक प्रतिनिधी प्रशांत चिटनुरवार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, बाजारात विक्रीकरीता असणा-या अन्न पदार्थांमध्ये कोणत्याही भेसळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच दुकानांची / आस्थापनांची नियमित तपासणी करावी. भेसळ करणा-यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी. बाजारातील अन्न पदार्थांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करावी. सुगंधी गुटखा, प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त श्री. उमप यांनी सादरीकरण केले.
येथे करा तक्रार : याबाबत नागरिकांना तक्रार नोंदवायची असल्यास ‘वंदे मातरम चांदा’ टोल फ्री क्रमांक 1800-233-8691 तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-222-365, याशिवाय foscos.gov.in या संकेतस्थळावरील Food Consumer Grievance वर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते.
00000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment