Search This Blog

Wednesday, 4 June 2025

सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा - जिल्हाधिकारी विनय गौडा


 

सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø बकर ईदच्या पार्श्वभुमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक

चंद्रपूरदि. 4 जून : जिल्ह्यात 7 जून रोजी बकर ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हा नावलौकिक कायम राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वांनी शांततेत सण उत्सव साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या वतीने नियोजन सभागृह येथे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

शांतता समितीमध्ये ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आजची तरुण पिढी अनिर्बंधपणे सोशल मिडीयाचा वापर करतात. कृत्रीम बुध्दीमत्तेमुळे (एआय) त्यात भर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपापल्या परिसरातील तरुण पिढीला शांतता समितीच्या सदस्यांनी समजावून सांगावे. आपल्या पोस्टमुळे काही अघटीत घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कुर्बाणीचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करू नये. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवावे. सोशल मिडीयासंदर्भात काही शंका आल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे किंवा 112 वर कॉल करून माहिती द्यावी.

सणांच्या कालावधीत नियमित पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य नियोजन करावे. वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बकर ईदच्या कालावधीत कुर्बाणी झाल्यानंतर अनावश्यक असलेले पदार्थ/ साहित्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून कोणचाही आक्षेप येणार नाही. तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

अशा आहेत सदस्यांच्या सुचना : यावेळी जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. सद्या सणासुदीच्या दिवसांत नियमित पाणी पुरवठा व्हावा, वीज पुरवठा खंडीत होऊ नये, कुर्बाणीमुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अफवांवर वेळीच निर्बंध घालावे, उभारण्यात येणा-या तात्पुरत्या कत्तल खान्यात लाईट आणि पाण्याची व्यवस्था चांगली असावी. मांसची वाहतूक उघडपणे न करता ती झाकून करावी, आदी सुचना सदस्यांनी मांडल्या.

००००००

No comments:

Post a Comment