Search This Blog

Saturday, 6 October 2018

वन्यजीव सप्ताहाचा ना. मुनगंटीवार यांच्याहस्ते समारोप पथनाटयातून विविध महत्‍वपूर्ण विषयांवर केलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सादरीकरणाचे मुनगंटीवार यांनी केले कौतुक




चंद्रपूर दि 6 ऑक्टोंबर :शालेय विद्यार्थ्‍यांनी पथनाटयांच्‍या माध्‍यमातून पाणी वाचवा, वन्‍यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्‍यजीव संघर्ष अशा विविध महत्‍वपूर्ण विषयांवर भाष्‍य करत आपली उत्‍कृष्‍ट कला तर प्रदर्शित केलीच त्‍यासोबतच वनविभागाला योग्‍य मार्ग दाखविला आहे. त्या माध्‍यमातून वनविभाग निश्‍चीतच योग्‍य उपाययोजना करण्‍याचा प्रयत्‍न करेल, असे प्रतिपादन करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दिनांक 6 ऑक्‍टोबर रोजी चंद्रपूर तालुक्‍यातील मोहर्ली येथे ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या वतीने वन्‍यजीव सप्‍ताहानिमीत्‍त  आयोजित विविध स्‍पर्धांच्‍या पारितोषीक वितरण समारंभात तसेच इलेक्‍ट्रीक बॅटरी वाहनाच्‍या लोकार्पण सोहळयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, ‘देव बोलतो बालमुखातुन, देव बोलतो उंच पिकातुन’ अशी म्‍हण आपल्‍याकडे रूढ आहे. ही बालवाणी म्‍हणजे देववाणी आहे. यातुन पाण्‍याचे महत्‍व, वन्‍यजीवांचे महत्‍व शालेय विद्यार्थ्‍यांनी नेमक्‍या पध्‍दतीने विशद केले आहे. पर्यावरणाच्‍या रक्षणाच्‍या दृष्‍टीने वन्‍यजीव विशेष महत्‍वाचे आहे. वाघ पर्यटकांना आकर्षीत करतो तसेच शेकडो लोकांना रोजगारही देतो. पर्यावरण संवर्धनाच्‍या दृष्‍टीने स्‍व. उत्‍तमराव पाटील वनउद्यान, इको पार्क, ऑक्‍सीजन पार्क आपण तयार करतो आहोत. बांबु मिशनच्‍या माध्‍यमातुन बांबु धोरणाला आपण चालना दिली आहे. राष्‍ट्रपती भवनात सुध्‍दा बांबु लागवडीसाठी महाराष्‍ट्राच्‍या वनविभागाला आमंत्रीत करण्‍यात आले आहे. वनविभागाचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख व्‍हावे यासाठी परिश्रम घेणा-या वनविभागाच्‍या अधिकारी व कर्मचा-यांचा सुध्‍दा सिंहाचा वाटा असल्‍याचे वन‍मंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.
यावेळी वन्‍यजीव सप्‍ताहानिमीत्‍त आयोजित विविध स्‍पर्धांमधील विजेत्‍या विद्यार्थ्‍यांना वनमंत्र्यांच्‍या हस्‍ते पारितोषीके वितरीत करण्‍यात आली. वनविभागातील तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना सत्‍कार देखील यावेळी करण्‍यात आला. यावेळी इलेक्‍ट्रीक बॅटरी वाहनाचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे श्री. ऋषीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाचे क्षेत्र संचालक श्री. एन. प्रवीण, उपवनसंरक्षक श्री. गजेंद्र नरवणे, मनपा सदस्‍य रामपाल सिंह,जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे, जिल्‍हा परिषद सदस्‍या वनिता आसुटकर, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, विलास टेंभुर्णे, हनुमान काकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
000

सबका साथ सबका विकास या संकल्‍पनेनुसार विकास करण्‍याचा आमचा संकल्‍प - ना.सुधीर मुनगंटीवार


चिरोली येथे अंधारी नदीवर बंधारा बांधकामाचे भूमीपूजन संपन्‍न

चंद्रपूर दि 6 आक्टोबर :बांबु हा कल्‍पवृक्ष आहे. गेल्‍या चार वर्षात बांबु क्षेत्रात राज्‍य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चिचपल्‍ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय आपण घेतला. काल पुण्‍यात बांबु हॅन्‍डीक्राफ्ट आर्ट युनिटचे उदघाटन राज्‍यपालांच्‍या हस्‍ते झाले. बांबु शेतीला प्रोत्‍साहन देण्‍याची भूमीका राज्‍य शासनाने घेतली आहे. या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात सुध्‍दा वाढ होणार आहे. कोणत्‍याही गावाला पुढे जायचे असेल तर त्‍या गावाचा स्‍वभाव विकसनशील असणे आवश्‍यक आहे. नवे प्रयोग स्विकारण्‍याची तयारी गरजेची आहे. चिरोली गावात अंधारी नदीवर बंधारा बांधण्‍याचे काम सुरू झाले आहे. याचा सदुपयोग करण्‍याची जबाबदारी आता नागरिकांची असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पंतप्रधानांच्‍या सबका साथ सबका विकास या संकल्‍पनेनुसार जिल्हाला सर्वाधिक विकसित करण्‍याचा संकल्‍प आम्‍ही केला असल्‍याचेही ते म्‍हणाले.
      दिनांक 6 ऑक्‍टोबर रोजी मुल तालुक्‍यातील चिरोली येथे राज्‍यसभा सदस्‍य खा. अनु आगा यांच्‍या खासदार स्‍थानिक विकास निधीतुन बांधण्‍यात येत असलेल्‍या 1 कोटी 93 लक्ष रू. किंमतीच्‍या 90 मीटर लांबीच्‍या  बंधा-याचे ना. भुमीपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिक प्रमोद बोनगीरवार, अप्‍पर मुख्‍य सचिव तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालक सचिव प्रविणसिंह परदेशी, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, डॉ. जिल्‍हाधिकारी कुणाल खेमनार, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जयस्‍वाल, जिल्‍हा परिषद सदस्‍य पृथ्‍वीराज अवताडे, पंचायत समिती सदस्‍या  वर्षा लोनबले, चिरोलीच्‍या सरपंच कविता सुरमवार, मुल नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, टोलेवाहीच्‍या सरपंच  मंजुषा बोंडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
बल्‍लारपूर विधानसभा मतदार संघ हा राज्‍यातील सर्वाधिक विकसित मतदार संघ ठरावा असा आपला प्रयत्‍न असल्‍याचे सांगत   ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, हा मतदार शंभर टक्‍के आरोयुक्‍त, शंभर टक्‍के एलपीजी गॅसयुक्‍त, शंभर टक्‍के बस प्रवासी निवारा शेडयुक्‍त करण्‍याचा आपला मानस आहे. बीपीएल धारकांच्‍या शिधापत्रिकांवर ज्‍या प्रमाणे स्‍वस्‍त दरात धान्‍य दिले जाते त्‍याच धर्तीवर एपीएल कार्डधारकांना सुध्‍दा धान्‍य देण्‍याचा प्रयोग मिशन दिनदयाल अंतर्गत आपण चंद्रपूर जिल्‍हयात राबविणार आहोत. मिशन आरोग्‍य च्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे उत्‍तम व सर्व सुविधांनी युक्‍त करण्‍यासोबतच कोणताही नागरिक गरीब आहे म्‍हणून कोणत्‍याही उपचारापासून वंचित राहू नये अशी सक्षम आरोग्‍य यंत्रणा आपण उभी करणार आहोत. आयुष्‍यमान भारत, महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना या आरोग्‍य विषयक योजनांची चंद्रपूर जिल्‍हयात प्रभावी अंमलबजावणी करत मिशन आरोग्‍यावर आपण भर देणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले
        टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील 5 हजार शेतक-यांसाठी सधन शेतकरी प्रकल्‍प राबवित असल्‍याचे सांगत ते पुढे म्‍हणाले, शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ करण्‍यासाठी आपण राबवित आहोत. सिंदेवाही येथे नोव्‍हेंबर महिन्‍यात धान संशोधन शिबीर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन राबविण्‍यात येणार आहे. उथळपेठ या गावाला आदर्श गाव म्‍हणून मी दत्‍तक घेतले आहे. या गावात सोलर ऊर्जेचा प्रयोग आपण राबविणार असून यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्‍ट च्‍या सीएसआर च्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करण्‍याचे आश्‍वासन ज्‍येष्‍ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले.
चिरोली येथील अंधारी नदीवर बंधारा बांधण्‍याची संकल्‍पना ज्‍येष्‍ठ नागरीक प्रमोद बोनगिरवार यांनी मांडली व प्रविणसिंह परदेशी यांनी ती संकल्‍पना पुढे नेली. त्‍या माध्‍यमातुनच आज या बंधा-याचे भुमीपूजन होत असल्‍यामुळे प्रमोद बोनगिरवार व  प्रविणसिंह परदेशी यांचे आभार अर्थमंत्र्यांनी व्‍यक्‍त केले. समाजाप्रती अशी जागरूकतेची भावना निर्माण होणे आज गरजेचे झाले असल्‍याचेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. 
000

मिशन शक्ती, मिशन सेवा, या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची देशांमध्ये प्रतिमा उंचवा: ना. सुधीर मुनगंटीवार



'भारत माता की जय ' सोबत 'भारतमातेची जय ' करण्यासाठी कामाला लागा !

चंद्रपूर दि 6 ऑक्टोबर : आपल्या जोशपूर्ण भाषणासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवाशक्ती पुढे आज जिल्ह्याला भारतातील समृद्ध ,विकसित व सर्व दृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. 'मिशन शक्ती', 'मिशन सेवा' ,या दोन उपक्रमातून भारतातील 712 जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात उजवा ठरावा,असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
           स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित एका भरगच्च कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रपूरच्या नावात अद्याक्षर 'च ' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टापुढे करावेच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा आणि ते करावच लागेल यासाठी 24तासांचे नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो वा बाबुपेठ मधला सामान्य विद्यार्थी असो मेहनत करण्यासाठी 24 तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासाचा सदुपयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी,गोविंद सारडा,रामू तिवारी, अजय मस्के ,मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते.
                  यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला.ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमाना एवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते.माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात असे हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनन केले.
             चंद्रपूरमधून ऑलिम्पिक पटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाऱ्या मिशन सेवा या दोन उपक्रमाची मांडणी त्यांनी विद्यार्थ्यांनी पुढे केली.ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून ऑलिम्पिक साठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि 24 तासाची योग्य आखणी  करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे.भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा  एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की , 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे '. तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात बहात्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी येत्या काही काळामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उल्लेख केला. 0 ते 18 वयोगटातील कोणताही विद्यार्थी औषधोपचाराअभावी मागे राहता कामा नये, असे ते म्हणाले. बल्लारपूर तालुक्यामध्ये लवकरच 'युथ एम्प्लॉमेंट समीट ' घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

                सध्याच्या युगामध्ये भौतिक सुखाच्या मागे लागून 'मै और मेरा परिवार बाकी दुनिया बेकार ' , या चौकटीतून बाहेर पडून जातीविरहित समाज निर्माण करणाऱ्या युवकांचा जिल्हा म्हणून पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले. भारत माता की जय म्हटल्यानंतर आपल्या रगामध्ये चैतन्य संचारते.मात्र केवळ भारत माता की जय म्हणून होणार नाही. 'भारत मातेची जय ' करण्यासाठी ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात अव्वल प्रदर्शन करण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादनही त्यांनी शेवटी केले. या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांपुढे बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अजय मस्के यांनी केले.  विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर पालकमंत्री यांच्या सोबत प्रत्यक्ष संवाद साधला व छायाचित्रे देखील काढून घेतली.
000

Tuesday, 2 October 2018

पोषन अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर



अध्यक्ष देवराव भोंगळे यांना संबोधनाचा सन्मान
चंद्रपूर दि १ ऑक्टोबर : दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात राबवण्यात आलेल्या पोषण अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेने उत्तम कामगीरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांचा यासाठी ग्रामविकास मंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे.
                जिल्हा परिषद चंद्रपूर महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत राबवण्यात आलेल्या पोषण अभियानाच्या माध्यमातून पोषण महिना सप्टेंबर 2018 च्या प्रचार व प्रसिद्धी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग,  एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सर्व द्वितीय क्रमांकाने कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक  देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे,  ग्रामविकास सचिव  गुप्ता, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष  देवरावजी  भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जितेंद्र पापळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, बालविकास  प्रकल्प अधिकारी, राजुरा  किरण सुर्यवंशी, व अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रकल्प नागभीड येथील निवडक सेविका उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना यावेळी उपस्थितांना संबोधीत करण्याचा सन्मान देण्यात आला. जिल्ह्यातील अभियानात राबवण्यात आलेल्या कल्पकतेची त्यांनी मांडणी केली. चंद्रपूर जिल्हयात सुरू असलेल्या जि.प. च्या योजनांची माहिती त्यांनी दिली. या पोषण अभियानामध्ये जिल्हा परिषद चंद्रपुर महिला व बालकल्याण विभागाने राज्यामध्ये पोषण अभियानात द्वितीय क्रमांकाची कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले. सदरचे पोषण माह अभियान राबविण्यामध्ये  जिल्हाधिकारी चंद्रपूर , जिल्हा अभिसरण समिती , महसूल विभाग , ग्राम विकास विभाग , पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , शिक्षण व आरोग्य विभाग , पंचायत विभाग , एमएसआरएलएमयांचे बचत गट यांचे मोलाचे योगदान लाभले .
००००

महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली


चंद्रपूर दि 2 ऑक्टोबर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी, जय जवान जय किसान नारा देणारे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांना आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदरांजली व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी  डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी घनशाम भूगावकर यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित कर्मचारी – अधिकारी यांनीही आदरांजली वाहिली.
000