Search This Blog

Tuesday, 9 October 2018

आरोग्य यंत्रणेने प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे इ-कार्ड वाटपाबाबत सक्षम यंत्रणा उभारावी - ना.मुनगंटीवार


आयुष्यमान योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा
चंद्रपूर, दि.09 ऑक्टोंबर – 23 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या राष्ट्रव्यापी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील इ-कार्ड वाटप करतांना प्रत्येक नागरिकाला सुलभरित्या त्याचे वितरण होईल, अशी खात्रीशी यंत्रणा उभारण्याबाबतच्या सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी या योजनेचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार संजय धोटे, आमदार किर्तीकुमारभांगडिया, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे आदी उपस्थित होते.
            प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत शंभर टक्के जनतेला आरोग्य विम्याचे कवच दिले जाणार आहे. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला ई-कार्डचे वितरण सुलभरित्या होणे आवश्यक आहे. यासाठी आजच्या आढावा बैठकीतूनच राष्ट्रीय आरोग्य समितीच्या मुख्य कार्यकारी अधिका   -यांशी पालकमंत्र्यांनी संपर्क साधला. जिल्हयामध्ये 12 लाख लाभार्थी कुटुंबाना या कार्डचे वाटप करायचे असून ग्राम पंचायत पातळीवर सुविधा केंद्रामार्फत वितरण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावर देखील आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
            जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साठे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुळावार यांनी यावेळी मॉडेल हेल्थ डिस्ट्रीक संदर्भातील सादरीकरण केले. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा इतर कोणत्याही जिल्हयापेक्षा अधिक सक्षम असावी, असे आवाहन यावेळी त्यांनी अधिका-यांना केले. यावेळी आयुष हॉस्पीटल, प्रस्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, एमआर मशीनबाबत विषयांवरही चर्चा झाली.                                                
000

28 व 29 ऑक्टोंबरला बल्लारपूर येथे ‘युथ एम्पॉवरमेंट समीट - ना.सुधीर मुनगंटीवार


राज्यातील 50 कंपन्यांच्या आस्थापनाचा सहभाग
रोजगारयुक्त जिल्हा बनविण्यासाठी एकाच छताखाली सर्व योजना
        चंद्रपूर दि.09- चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी, व्यवसाय, कृषी व सामाजिक क्षेत्रात करियर घडविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण,कर्जपुरवठा आणि उपलब्ध संधीची माहिती देण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे युथ एम्पॉवरमेंट समीट रोजगार महामेळावा  28 व 29 ऑक्टोंबरला घेतली जाणार आहे. एकाच छताखाली सुशिक्षित बेरोजगारांचा कल ओळखणे, त्याला प्रशिक्षणांची माहिती देणे, त्यासाठी कर्ज पुरवठा करणे व जागेवरच मुलाखती घेवून काही आस्थापनात नोकरी उपलब्ध करुन देणे, असे या युवा सशक्तीकरण आयोजनाचे स्वरुप राहणार आहे.
            राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी या अभिवन आयोजनाची आज घोषणा केली.  याच संदर्भात राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार निर्मिती, उद्योग, कृषी, सहकार, समाज कल्याण,बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मत्ससंवर्धन, दुग्धव्यवसाय, वेगवेगळया प्रशिक्षण देणा-या संस्था, विविध महामंडळ, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी, सर्व बँकाचे पदाधिकारी व राज्य शासनाच्या रोजगार निर्मितीशी संबंधीत असणा-या सर्व विभागाच्या प्रमुख अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीला वेगवेगळया वाणिज्यिक, औद्योगिक आस्थापनाशी समन्वय ठेवणा -या यंत्रणा देखील उपस्थित होत्या.   
            स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या युथ एम्पॉवरमेंट समीट तयारी संदर्भातील बैठकीला आमदार अनिल सोले, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना आमदार अनिल सोले यांनी या मेळाव्यामध्ये एकाच छताखाली वेगवेगळी माहिती, मुलाखती व संधी उपलब्ध असावी, अशा पध्दतीचे नियोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी वस्त्रोद्योग, लॉजीस्टीक यंत्रणेतील चालक, सुरक्षा कर्मचारी अशा मोठया प्रमाणातील संधी उपलब्ध करण्याबाबत मागणी केली. पालकमंत्र्यांनी यावेळी 28 तारखेच्या या मेळाव्याच्या दृष्टीने सर्व विभागाने आपल्याकडे असणा-या कामाची पूर्तता करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिका-यांनी वेगवेगळया समित्यांचे गठण करण्याबाबतही मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात 50 कंपन्यांच्या आस्थापनांचा सहभाग असणार आहे.  
रोजगारयुक्त जिल्हयासाठी सहा सूत्रात करणार बांधणी
यावेळी बोलतांना पालकमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्हयाला रोजगार युक्त करण्यासाठी 6 सूत्रांमध्ये जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. यामध्ये, पुढील सहा विषयाच्या संदर्भात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा पुढील काळामध्ये जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय यंत्रणेला निर्देश दिले.
1.मिशन सेवा- ही संपूर्णता नोकरीमध्ये उत्सुकता असणा-या विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना असेल.
2.मिशन स्वयंरोजगार - मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज व त्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील उपाय योजना.
3.मिशन कौशल्य – यामध्ये राज्य शासनाच्या व अन्य खासगी संस्थांचे प्रशिक्षण, व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची    
    उपाय योजना.
4.मिशन फॉरेन सर्व्हिसेस – यामध्ये विदेशातील शिक्षण व प्रशिक्षण घेणा-या उपाययोजना असतील.
5.मिशन उन्नत शेती- कृषी व्यवसायात आवड असणा-यांना आधुनिक शेती व त्यावर आधारीत उद्योगाची माहिती उपलब्ध
   करणे.
6.मिशन सोशलवर्क- सार्वजनिक क्षेत्रात विविध लोकोपयोगी उपक्रमात झोकून देणा-या युवकांसाठी प्रशिक्षणाची उपाययोजना.
000

Monday, 8 October 2018

आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातून पत्रकारांनी विचारांची ऊर्जा निर्माण करावी – ना.सुधीर मुनगंटीवार



त्रकारितेने सर्वसामान्‍य माणसाच्‍या सक्षमीकरणाचे काम केले
– ज्‍येष्‍ठ पत्रकार संजय आवटे

चंद्रपूर, दि.07 ऑक्टोंबर- बदलत्‍या सामाजिक परिस्‍थीतीत अभ्‍यासू, निर्भीड पत्रकारितेची नितांत गरज आहे. प‍त्रकारिता ही सत्‍यावर आधारित असली पाहीजे. चंद्रपूर जिल्‍हा हा ऊर्जा देणारा जिल्‍हा आहे. त्‍यामुळे या जिल्‍हयातील पत्रकारांनी विचारांची ऊर्जा आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातुन निर्माण करण्‍याची आवश्‍यकता आहे. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघ ही केवळ संघटना नसुन पत्रकारांची गुणवत्‍ता वाढविण्‍याचे ते एक व्‍यासपीठ असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
7 ऑक्‍टोबर रोजी चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या कर्मवीर कन्‍नमवार सभागृहात चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित कर्मवीर पुरस्‍कार वितरण सोहळयात राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्रमुख वक्‍ते या नात्‍याने ज्‍येष्‍ठ पत्रकार  संजय आवटे, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संजय तुमराम यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले,  एखादा डॉक्‍टर चुकला तर काही काळ आरोग्‍याची समस्‍या निर्माण होईल, मात्र पत्रकार चुकला तर समाजस्‍वास्‍थ्‍य बिघडेल. त्‍यामुळे आपण जरी जग बदलवू शकत नसलो तरीही स्‍वतःमध्‍ये बदल घडवत आपल्‍यातील गुणवत्‍ता वाढविण्‍यावर भर द्यावा, असेही ते म्‍हणाले. पत्रकारबांधवांच्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या, पत्रकार कल्‍याण निधीसाठी 15 कोटी रू. निधीची तरतूद अशा विविध माध्‍यमातून शासनाने पत्रकारांच्‍या मागण्‍यांच्‍या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर जिल्‍हा मिशन शौर्य व अन्‍य सेवा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून देशाच्‍याच नव्‍हे तर जागतीक पातळीवर आपला झेंडा फडकवत आहे. त्‍यामुळे चंद्रपूरची पत्रकारिता ही राज्‍यासाठी आदर्शवत ठरावी, अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली.
यावेळी बोलताना ज्‍येष्‍ठ पत्रकार संजय आवटे यांनी पत्रकारीतेतील आव्‍हाने, बदलती पत्रकारिता यावर भाष्‍य केले. जेथे उजेड आहे तेथील प्रश्‍न सोडविण्‍यापेक्षा आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातुन अंधारवाटा प्रकाशमान करा, असे आवाहन त्‍यांनी केले. पत्रकारितेला लोकशाहीचे मोठे अधिष्‍ठान लाभले असून सर्वसामान्‍य माणसाच्‍या सक्षमीकरणाचे काम पत्रकारितेने कायम केले आहे. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाने पत्रकारांना प्रोत्‍साहीत करत त्‍यांना पुरस्‍कार देण्‍याचे जे कार्य केले आहे ते निश्‍चीतच अभिनंदनीय आहे कारण सत्‍कार ही सत्‍कार्याची संजीवनी असते, असेही श्री. संजय आवटे म्‍हणाले.
यावेळी बोलतांना त्यांनी आज लोकशाहीचे सर्व खांब खिळेखिळे होत असताना पत्रकारिता मात्र टिकून आहे. अंधार यात्रीमुळेच हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी कायम व्यवस्थेच्या विरुध्द उभे रहावे. व्यवस्थेच्या विरुध्द भूमिका मांडणारेच खरे पत्रकार असतात. लोकांचे सामर्थ्य अधोरेखीत करण्याची क्षमता आजही वर्तमानपत्रामध्ये आहे. त्यामुळेच प्रिंट माध्यम अजूनही लोकप्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलिकडे माध्यम बदलत आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. सोशल मिडीयामुळे माध्यमांची कक्षा रुंदावली आहे. तरीही जबाबदारी आणि जाणीव ठेवणारे माध्यम म्हणून प्रिंट मिडीयांच्या पत्रकारांची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्‍येष्‍ठ पत्रकार  अरूण दिवाण आणि विजय बनपूरकर यांचा कर्मवीर पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍यात आला. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित ग्रामीण वार्ता पुरस्‍कार, शुभवार्ता पुरस्‍कार आदी स्‍पर्धांच्‍या माध्‍यमातून विजेते ठरलेल्‍या पत्रकारांचा सन्‍मान यावेळी करण्‍यात आला. प्रास्‍ताविक अध्‍यक्ष संजय तुमराम यांनी केले. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्‍या इमारत बांधकामासाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्‍याबद्दल ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार त्‍यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी केले तर आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले. तत्पूर्वी ग्रामीणवार्ता पुरस्कारासाठी धनराज खारनोकर, राजकुमार चुनारकर, निलकंठ ठाकरे, आशिष देरकर, जितेंद्र सहारे यांना सन्मानीत करण्यात आले. मानवी स्वारस्य क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुरस्कार चुन्नीला कुठवे यांना देण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स मिडीया गटातील पुरस्कार दुस-या वर्षीही अनवर शेख यांना मिळाला. वृत्त छायाचित्र स्पर्धेत संदीप रायपूरे यांनी बाजी मारली. तर शुभवार्ता गटामध्ये हितेश गोहकार यांना पुरस्कृत करण्यात आले.
                                                            0000

मुद्रा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा : ना.सुधीर मुनगंटीवार


 चंद्रपूर, दि.07 ऑक्टोंबर - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणा-या मुद्रा योजनेतून जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळतांना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठतांना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे. चंद्रपूर जिल्हा या योजनेत आदर्श जिल्हा म्हणून पुढे आणतांना या वर्षामध्ये किमान 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा, असे निर्देश  राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.   
            स्थानिक नियोजन भवनात आयोजित मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुद्रा बँक योजना राबवितांना बँकांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. यासाठी परिसरातल्या लोकप्रतिनिधीनी देखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. खानापूर्ती करण्यासाठी ही योजना नसून यातून खरोखर उद्योजक उभे झाले पाहिजे. गुजरात मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला नौकरी मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांना उद्योग धंदयाची आवड आहे त्या सर्वांना यातून संधी दिली गेली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर आमदार अनिल सोले, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे,अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हयातील उपलब्ध असणा-या सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपआपल्या भागातील उद्दिष्ट निश्चित करावे. मुद्रा बँक कर्ज देणारा, त्याची परतफेड करणारा आणि त्यातून उद्योग उभारणारा उमेदवार देण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येवून केल्यास मुद्रा मधील योग्य उमेदवारांना लाभ मिळणे व या योजनेचा योग्य वापर होणे शक्य आहे. यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिका-यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी  केली. यासोबतच या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी सर्व यंत्रणांनी पुढे येण्याबाबतही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी जिल्हयातील सार्वजनिक सहभागाच्या उद्योग धंद्याना तसेच अनेक लोकांना एकाचवेळी मोठया प्रमाणात रोजगार मिळणा-या सर्व व्यापक उद्योगांना या योजनेतून लाभ मिळावा. त्यासाठी अशा लाभार्थ्यांच्या यशकथा मांडण्याचे आवाहन केले.

यावेळी मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील कोणते उद्योग उपयोगी पडू शकतात. त्यासाठी अन्य विभागाची मदत देखील घ्यावी, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले.
मुद्रा योजनेचे चंद्रपूर जिल्हयातील योगदान

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा यांनी चंद्रपूर जिल्हयामध्ये गेल्या दोन वर्षात मुद्रा योजनेतून वाटप करण्यात आलेल्या कर्ज पुरवठयाबाबतही माहिती दिली. मुद्रा योजनेतून 2018-18 या आर्थिक वर्षामध्ये चंद्रपूर जिल्हयात 17 हजार 500खातेदारकांना 160 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर 1 एप्रिल 2018 पासून सप्टेंबर महिना अखरेपर्यंत 70 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी तीन गट असून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून यासाठी सुलभतेने कर्ज उपलब्ध केल्या जाते.     

Saturday, 6 October 2018

वन्यजीव सप्ताहाचा ना. मुनगंटीवार यांच्याहस्ते समारोप पथनाटयातून विविध महत्‍वपूर्ण विषयांवर केलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सादरीकरणाचे मुनगंटीवार यांनी केले कौतुक




चंद्रपूर दि 6 ऑक्टोंबर :शालेय विद्यार्थ्‍यांनी पथनाटयांच्‍या माध्‍यमातून पाणी वाचवा, वन्‍यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्‍यजीव संघर्ष अशा विविध महत्‍वपूर्ण विषयांवर भाष्‍य करत आपली उत्‍कृष्‍ट कला तर प्रदर्शित केलीच त्‍यासोबतच वनविभागाला योग्‍य मार्ग दाखविला आहे. त्या माध्‍यमातून वनविभाग निश्‍चीतच योग्‍य उपाययोजना करण्‍याचा प्रयत्‍न करेल, असे प्रतिपादन करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दिनांक 6 ऑक्‍टोबर रोजी चंद्रपूर तालुक्‍यातील मोहर्ली येथे ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या वतीने वन्‍यजीव सप्‍ताहानिमीत्‍त  आयोजित विविध स्‍पर्धांच्‍या पारितोषीक वितरण समारंभात तसेच इलेक्‍ट्रीक बॅटरी वाहनाच्‍या लोकार्पण सोहळयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, ‘देव बोलतो बालमुखातुन, देव बोलतो उंच पिकातुन’ अशी म्‍हण आपल्‍याकडे रूढ आहे. ही बालवाणी म्‍हणजे देववाणी आहे. यातुन पाण्‍याचे महत्‍व, वन्‍यजीवांचे महत्‍व शालेय विद्यार्थ्‍यांनी नेमक्‍या पध्‍दतीने विशद केले आहे. पर्यावरणाच्‍या रक्षणाच्‍या दृष्‍टीने वन्‍यजीव विशेष महत्‍वाचे आहे. वाघ पर्यटकांना आकर्षीत करतो तसेच शेकडो लोकांना रोजगारही देतो. पर्यावरण संवर्धनाच्‍या दृष्‍टीने स्‍व. उत्‍तमराव पाटील वनउद्यान, इको पार्क, ऑक्‍सीजन पार्क आपण तयार करतो आहोत. बांबु मिशनच्‍या माध्‍यमातुन बांबु धोरणाला आपण चालना दिली आहे. राष्‍ट्रपती भवनात सुध्‍दा बांबु लागवडीसाठी महाराष्‍ट्राच्‍या वनविभागाला आमंत्रीत करण्‍यात आले आहे. वनविभागाचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख व्‍हावे यासाठी परिश्रम घेणा-या वनविभागाच्‍या अधिकारी व कर्मचा-यांचा सुध्‍दा सिंहाचा वाटा असल्‍याचे वन‍मंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.
यावेळी वन्‍यजीव सप्‍ताहानिमीत्‍त आयोजित विविध स्‍पर्धांमधील विजेत्‍या विद्यार्थ्‍यांना वनमंत्र्यांच्‍या हस्‍ते पारितोषीके वितरीत करण्‍यात आली. वनविभागातील तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना सत्‍कार देखील यावेळी करण्‍यात आला. यावेळी इलेक्‍ट्रीक बॅटरी वाहनाचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे श्री. ऋषीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाचे क्षेत्र संचालक श्री. एन. प्रवीण, उपवनसंरक्षक श्री. गजेंद्र नरवणे, मनपा सदस्‍य रामपाल सिंह,जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे, जिल्‍हा परिषद सदस्‍या वनिता आसुटकर, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, विलास टेंभुर्णे, हनुमान काकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
000