Search This Blog

Saturday, 20 October 2018

चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी कटिबद्ध



चंद्रपूर दि.17 ऑक्टोबर : संपूर्ण देशातील विषमता नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषमता मुक्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूया असे राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी  ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात नागपूर नंतर चंद्रपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दरवर्षी 15 व 16 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात येते. लाखोच्या संख्येने याठिकाणी बौद्ध धर्माचे अनुयायी व आंबेडकरी विचारांचे पाईक उपस्थित असतात. मोठ्या संख्येने जमलेल्या या अनुयायांना आवाहन करताना आज अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आजचा दिवस फक्त अनुप्रवर्तन दिन नाही तर ज्या जागेवर दीक्षा घेतली आहे त्याचे आचरण करण्याचा संकल्प करण्याचा दिन आहे. आपल्या हातून दुसर्‍यावर अन्याय होणार नाही याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
         चंद्रपूरची भूमि ही क्रांतीची भूमी आहे. चिमूर, आष्टीचा क्रांती लढा इथला प्रसिद्ध आहे. चीनच्या आक्रमणानंतर सर्वात जास्त सुवर्ण दान देण्याचा पराक्रमही चंद्रपूरचा आहे. भारतामध्ये नागपूर नंतर दुसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमी देखील चंद्रपूर येथेच आहे. त्यामुळे या भूमीची महती कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची आपली जबाबदारी आहे. नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्याचे महत्त्व देशामध्ये वाढले पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी साठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिला व यानंतरही दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी विकासाच्या संदर्भात स्थानिक आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सर्व संबंधितांना घेऊन योग्य प्रस्ताव द्यावेत. शासनाकडून अपेक्षित प्रस्ताव मान्य करून आणण्याची जबाबदारी आपली राहील, असेही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदाया पुढे स्पष्ट केले.
       यावेळी त्यांनी बल्लारपूर येथे होत असलेल्या युथ एम्पॉवरमेंट समीटचाही उल्लेख केला. राज्य शासन 72 हजार नोकर भरती करणार आहे. या नोकरभरतीमध्ये चंद्रपूरचा टक्का अधिक असावा यासाठी युवाशक्तीने  चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मिशन सेवा, मिशन कौशल्य विकास, मिशन समाजकार्य, मिशन फॉरेन सर्विस, मिशन कृषी आदी घटकातील रोजगार महामेळाव्यात 28 व 29 ऑक्टोंबरला सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
          यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आज जमलेला जनसमुदाय हा शिस्त आणि श्रद्धेचा समुदाय असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार केला. त्यांचा संघर्ष निशस्त्र होता. त्यामुळे हातामध्ये शस्त्र घेणारे बाबासाहेबांचे अनुयायी असू शकत नाही, असे स्पष्ट केले. दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. केद्र शासनाकडून दीक्षाभूमीच्या विकासाचे काही प्रस्ताव लवकरच पूर्ण होतील, असे त्यांनी सूतोवाच केले.
           आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी बाबासाहेबांच्या प्रचंड संघर्षानंतरही समाजामध्ये अद्यापही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असून आर्थिक विषमता दूर करण्याचा त्यांचा लढा पुढे करण्यासाठी अनुयायांनी पुढे यावे, असे आवाहन केले. बाबासाहेबांनी कोण्या एकाच समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केले नाही. तर त्यांना सामुदायिक उत्कर्षाची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी दिलेल्या बौद्ध धर्माची शिकवण अंमलात आणतांना कुणाच्या धर्मावर टीका करून धर्माचा विस्तार होणार नाही. तर त्यांच्या पूर्ण शिकवणीची अंमलबजावणी पुढच्या काळात करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजलीताई घोटेकर यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,  महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभापती अर्चना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, मारोतराव खोबरागडे, याशिवाय दिल्लीवरून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले डॉक्टर रतनलाल,  प्राचार्य राजेश दहेगावकर, राहुल घोटेकर, कुणाल घोटेकर तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मनोज सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन सचिव वामन मोडक यांनी केले.
                                                                        0000

Monday, 15 October 2018

शालेय टेनिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन नागपूर विभागाचा दोन गटात विजय



चंद्रपूर दि.15 ऑक्टोबर –  चंद्रपूर जिल्ह्यात 15 ते 17 ऑक्‍टोबर या काळामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन करण्यात आले. आज झालेल्या 14, 17 व 19 वयोगटातील स्पर्धामध्ये नागपूर विभागाने पहिल्या दिवशी विजय संपादन केले. उदया शालेय टेबल टेनिस स्पर्धेवरील विभागाचे वर्चस्व स्पष्ट होणारे आहे. या स्पर्धेला मोठया संख्येने प्रक्षेक म्हणून उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले आहे.
आज झालेल्या उदघाटन समारंभाला चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर उदघाटक म्हणून उपस्थित होत्या. तर अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, विशेष कार्यकारी अधिकारी, डॉ.विजय इंगोले, महाराष्ट्र टेबल टेनिस अशो.चे कार्यकारी सदस्य ॲड.आशुतोष पोतनिस, विभागीय सचिव प्रकाश जसानी, छत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी संघटक प्रा.वसंत आकुलवार, जिल्हा टेबल टेनिस असो.चे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी,  सचिव राकेश तिवारी, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांची उपस्थिती होती. तीन गटामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 324 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगला आसुटकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अब्दुल मुस्ताक यांनी केले. मान्यवरांनी यावेळी खेळाडूंना शपथ दिली. पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये 17 वर्ष वयोगटात नाशिक, क्रीडा प्रबोधिनी नागपूर, औरगांबाद, 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात मुंबई, लातूर, 14 वर्ष मुलांच्या गटात कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी पुणे, अमरावती, नागपूर, 14 वर्ष मुलींच्या गटात पुणे, क्रीडा प्रबोधिनी मुंबई व अमरावती संघानी विजय मिळविला.
                                                0000

Sunday, 14 October 2018

महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या पत्रकारितेचे चंद्रपूर अधिष्ठान व्हावे : ना.सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूर प्रेस क्लबचा ना.अहीर, ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ

चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : एखादा प्राध्यापक चुकला तर विद्यार्थी बिघडतात, डॉक्टर चुकला तर आरोग्य बिघडते, मात्र पत्रकार चुकल्यास मोठ्या समूहाचे, एकूण समाजाची हानी होते. त्यामुळे हा व्यवसाय आजही सतीचे वाण असून त्याची प्रतिष्ठा व त्याचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत राखला गेला पाहिजे. चंद्रपूरला व्यासंगी पत्रकारितेचा वारसा आहे. महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या पत्रकारितेचे चंद्रपूर अधिष्ठान व्हावे, अशी सदिच्छा राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका शानदार कार्यक्रमात उभय नेत्यांनी चंद्रपूर प्रेस क्लबच्या शाखेची सुरुवात झाल्याचे घोषित केले. चंद्रपूर येथील पत्रकार बांधवांनी नव्याने चंद्रपुर प्रेस क्लबची स्थापना केली आहे. या प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना चंद्रपूरच्या पत्रकारितेने महाराष्ट्रामध्ये आपले स्थान अग्रस्थानी निर्माण करावे, अशी अपेक्षा ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पत्रकारांना संबोधित करण्यासाठी तरुण भारतचे संपादक तसेच कथाकार, चित्रपट पटकथा लेखक श्याम पेठकर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये चंद्रपूर शहराचे आपल्या व्यंगचित्राने नावलौकिक वाढविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार, लेखक, पत्रकार व ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांचा चंद्रपूर गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधताना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारिता हा व्यवसाय त्यागाचा असून समाजाला काही  देणारा हा वर्ग असतो. त्यामुळेच या व्यवसायाची प्रतिष्ठा आजही कायम आहे. पत्रकारिता करताना अनेक चौकटी पाळाव्या लागतात. अनेक लक्ष्मण रेषा या व्यवसायात आखलेल्या असतात. मात्र समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ही एक धडपड असते. त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्या तरुणांचे वाचन आणि माध्यमांच्या संदर्भातील त्यांचा अभ्यास दांडगा असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेस क्लबच्या नव्या इमारतीमध्ये एका चांगल्या वाचनालयाची सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली. पत्रकारिता ही समाजाचे  भले करणाऱ्यांच्या हातात आलेली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या संधीचा आपण कशा पद्धतीने वापर करतात यावर समाजाचे भले अवलंबून असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी माध्यमांनी समाजातली कुठली शक्ती मोठी करायची या बाबतचा सारासार विचार करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. अशीच जागरूक पत्रकारिता नजीकच्या काळात आवश्यक असल्याचे ते म्हणाले. समाजातील दुर्जन शक्तीला लेखणीच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत मोठे होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. समाजहित, देशहीत सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगून यासाठीच आपल्या लेखणीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, पटकथाकार कथा लेखक, तथा तरुण भारतचे संपादक श्याम पेठकर यांनी देखील यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा पत्रकार असतो. त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध प्रश्न करण्याची तयारी असली पाहिजे, असे का ? हे प्रश्न पत्रकारांना कायम पडले पाहिजे,असे का घडते याबाबतची जागरूकता कायम लेखणीमध्ये असली पाहिजे. सध्याच्या काळात माणसाचे  व समाजाचे रोबोटिकरण होत आहे. कठपुथली सारखे कुणाच्या तरी सूचना, परंपरा कुठलाही प्रश्न न विचारता पाळण्याचे कार्य सुरू आहे. माध्यम समूह बाजाराला शरण गेली आहेत. अशावेळी खऱ्या पत्रकारांनी बिघडणाऱ्या समाज व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेतून शोधपत्रकारिता गायब झाली आहे. आता  शोध पत्रकारिता सामाजिक उत्थानासाठी न वापरता व्यक्तिगत मानहानीसाठी वापरली जाते. कुणीतरी आपल्या हाती काठी दिली आणि त्या काठीचा वापर करायला सांगितले. अशा दबावात पत्रकारिता राहू नये. या काठीचा वापर कशासाठी  कोण व का ? करायला लावत आहेत याचा सारासार विचार पत्रकारांनी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूर गौरव पुरस्कार प्राप्त करणारे मनोहर सप्रे यांनी देखील आपले मनोगत यावेळी मांडले. ते म्हणाले, या शहरावर आपले अतोनात प्रेम आहे.  हेशहर आपले एक विस्तारित कुटुंब असल्यामुळे आयुष्याची सायंकाळ या गावातच काढण्याचे आपण ठरवले आहे.  आपल्या भाषणात त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वनविभागातील कामाचा गौरव केला. वनावर मनापासुन प्रेम करणारा वनमंत्री भेटल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय रामगिरवार यांनी केले. मनोहर सप्रे यांचा परिचय मंगेश खाटीक यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रमोद उंदीरवाडे यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                            0000

Saturday, 13 October 2018

चंद्रपूरच्या नव्या ओळखीसाठी लोकप्रतिनिधींसोबत सामान्य नागरिकांनीही योगदान द्यावे :ना.सुधीर मुनगंटीवार





महानगरात एकाच दिवशी कोट्यावधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

चंद्रपूर दि.13 ऑक्टोंबर-  कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूर शहराला संबोधले जायचे. हे ऐकताना वेदना होत होत्या. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखून तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोग करून चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले जावे, हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व अन्य यंत्रणा सोबतच सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
         शनिवारी चंद्रपूर महानगरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाच्या आयोजनाच्या व्यासपीठावर त्यांनी संबोधीत केले. ते म्हणाले, सामान्य नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय विकास कामांना गती, दर्जा आणि लौकिक प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे विकासात लोकसहभाग आवश्यक ठरतो.
        शनिवारी सकाळी नऊ वाजता पासून आयोजित या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याला ना.सुधीर  मुनगंटीवार यांच्या सोबतच केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगराच्या महापौर अंजलीताई घोटेकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.
        शहराच्या विविध भागात घेण्यात आलेल्या या भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये बोलतांना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी शहरात होणाऱ्या विकास कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे अधिकार सामान्य नागरिकाला असले पाहिजेत यावर भर दिला. महानगरपालिकेने ठेकेदाराने हे काम करतानाच त्याच्या दुरुस्तीच्या कामाचीही जबाबदारी निश्चित केली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नागपूर रोड वरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करताना येथील ज्येष्ठ नागरिकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या बगीच्याची जबाबदारी घेतली आहे. अनेक ठिकाणी असेच नागरीकांचे पुढे येणे अपेक्षीत आहे. सरकार करेल तर सरकार म्हणजे वेगळे काय असते ? आपल्यापैकीच कुणीतरी लोकप्रतिनिधी झालेला असतो. त्यामुळे शहरात तयार होणाऱ्या रस्त्यांपासून तर सौदर्यी करण्यापर्यंत नागरिकांच्या समित्या बनवून त्याची देखभाल दुरुस्ती तसेच त्याच्या दर्जाची काळजी घेण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवावी. याचा अर्थ महानगरपालिका किंवा संबंधित यंत्रणा लक्ष देणार नाही, असा होत नाही. तर सामान्य माणसाचा सहभाग असल्यानंतर कामांमध्ये गुणात्मक सुधारणा दिसून येतात. त्यासाठी हे शहर माझे आहे. या शहराची प्रतिमा मला बदलायची आहे. या शहराला भारतातले उत्तम शहर बनवायचे आहे. या भावनेने प्रेरित होऊन लोकप्रतिनिधी, सार्वजनिक संस्था व सामान्य जनतेने काम केल्यास चंद्रपूरचा नावलौकीक वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
            भारतामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव टायगर कॅपिटल म्हणून ताडोबामुळे घेतल्या जाते. एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील मुलांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख होत आहे. या भागाचा कायापालट व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांना मिशन मोडवर राबवले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूर हे भारतातील विकसित जिल्हा म्हणून पुढे येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
          यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनीही संबोधित केले. नागपूरमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात विकासाचा धडाका सुरू आहे. तोच कित्ता आम्ही चंद्रपूरमध्ये गिरवत असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी चंद्रपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्याची तिजोरी ज्यांच्या हाती आहेत असे वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नगरसेवकांकडून आलेल्या कोणत्याही सकारात्मक व दर्जात्मक प्रस्तावाला निधी मिळू शकतो. त्यामुळे झोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नगरसेवकांना केले.
            शहराचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू असून नामदार मुनगंटीवार यांनी विकासात कोणत्याही भागाला दुजाभाव दिला नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूरातील दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी सुद्धा येणाऱ्या काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असून प्रशासनाच्या या कार्याला सामान्य नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. आयुक्त संजय काकडे यांचा या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध विकास कामांमध्ये सक्रियता दाखविल्याबद्दल सत्कार केला. तर शहराच्या सर्व भागामध्ये समतोल विकासाच्या योजना राबवावी अशी सूचनाही त्यांनी केली.
           या कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती जयश्री जुमडे, नगर सेवक वसंत देशमुख, सुभाष कासनगोटुवार, सखीना अंसारी, विना खनके, अनुराधा हजारे, सविता कांबळे आदी उपस्थित होते.
                                                                        0000

सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर अशी बल्लारपूरची महाराष्ट्रात ओळख होईल: ना.मुनगंटीवार




किल्ल्याच्या स्वरूपातील अद्यावत पोलीस स्टेशन इमारतीचे थाटात लोकार्पण
बल्लारपूर मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पद निर्मितीचे संकेत

चंद्रपूर दि. 13 ऑक्‍टोबर : महाराष्ट्रातील सर्वाधिक  देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचा देखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी रात्री केले. बल्लारपूर येथे किल्ल्याच्या स्वरूपातील पोलीस स्टेशनच्या देखण्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
             ब्रिटिश काळातील 1944 च्या इमारतीमध्ये बल्लारपूर येथील पोलीस ठाण्याचे काम सुरू होते. आता या ठिकाणी प्राचीन गोंड राज्याची राजधानी असलेल्या बल्लारपूर शहराच्या इतिहासाला साजेसे किल्ल्याच्या स्वरूपातील आधुनिक इमारतीचे लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्यात लवकरच बल्लारपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पद निर्माण करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. दोन मजली या किल्ल्याच्या आकारातील इमारतीमध्ये पोलीस विभागासाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात आल्या असून काल इमारतीचा लोकार्पण सोहळा  संपन्न झाला. यामध्ये  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले. या इमारती सोबतच कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची भव्य इमारत उभारण्यात आली असून त्याचे देखील यावेळी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमातच बल्लारपूर नगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस प्रकल्प, दिव्यांग निधी वाटप, नगर संरक्षण दल यासंदर्भात आयोजित अभिनव कार्यक्रमाचे सादरीकरण केले व बक्षीस वितरण देखील करण्यात आले. पोलीस विभागातर्फे नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये सतत चौथ्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. महिला व पुरुष खेळाडूंचा यावेळी दुचाकी देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्‍हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती .
यावेळी बोलताना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासाचा उल्लेख करताना गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह  यांची प्राचीन राजधानी ही बल्लारपूर होती. त्यानंतर ती चंद्रपूरला हलविण्यात आली. त्यामुळे या शहराच्या गतवैभवाला जोपासण्याचे दायित्व पार पाडणे गरजेचे असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात बल्लारपूर शहराच्या विकासामध्ये तसेच लौकिकामध्ये  भर टाकणार्‍या अनेक मोठ्या वास्तू व संस्था उभ्या राहत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या ठिकाणावरून जनतेने सातत्याने आपल्याला विधानसभेत पाठवत मोठे केले आहे. त्यामुळे बल्लारपूर सर्वात सुंदर शहर होईल, असे आश्वासन आपण गांधी चौकातल्या सभेत जनतेला दिले होते. बल्लारपूरचे रेल्वे स्थानक भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जात आहे. बल्लारपूर जवळ महाराष्ट्रातली दुसरी शासकीय सैनिकी शाळा पुढील वर्षापासून पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. बल्लारपूर मध्ये निर्माणाधीन असलेले क्रीडा संकुल ऑलिम्पिक पटू तयार करण्याच्या दर्जाचे व्हावे यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. बल्लारपूर व परिसरातील जनतेला आता मुंबईच्या नेहरू तारांगण मध्ये जावे लागणार नाही. बंगलोरच्या धर्तीवर तयार होणाऱ्या बॉटनिकल गार्डन मध्ये येथील जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी अटल प्लॅनेटोरियम उभारले जात आहे. केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या पुढाकाराने बल्लारपूर- गोंडपिंपरी- आष्टी हा राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. बल्लारपूर शहराच्या पाणीपुरवठ्याची कायम समस्या सोडवण्यासाठी वर्धा नदीवर तीनशे कोटीचे बॅरेज उभे राहणार आहे. तर शहरातील पाणीपुरवठा उत्तम व्हावा यासाठी 79 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या शहरातील उद्योग व्यवसायाच्या वारस्याला जपत या ठिकाणी डायमंड कटिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या नकाशावर आता बल्लारपूर आले आहे. चंद्रपूर येथे निर्माण होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे एक उपकेंद्र बल्लारपूरला सुरू करण्यात येणार आहे. बल्लारपूर शहर व मतदार संघातील सर्व जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी हा परिसर आरो युक्त पाण्याच्या पुरवठ्याचा भाग करण्याचा आपला मानस आहे. याशिवाय शंभर टक्के गॅस वापरणारा तालुका म्हणूनही बल्लारपूरची ओळख निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बल्लारपूर येथील नगरपालिकेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी नगराध्यक्ष हरिष शर्मा, मुख्याधिकारी बिपिन मुद्दा यांचे कौतुक केले. दिव्यांग निधी वाटप, बायोगॅस प्रकल्प,  रेन वॉटर हार्वेस्टिंग, नगर संरक्षण दल यासारख्या उपक्रमांना राबविणारी महाराष्ट्रातील उत्तम नगरपालिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी बल्लारपूर शहरातील आवास योजने संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करताना प्रतिपादन केले की, बल्लारपूर शहरातील नागरिकांना विविध आवास योजनेतून 3 हजार अत्याधुनिक घरे उपलब्ध केली जातील. राज्यातील ही सर्वोत्तम अशी निवास व्यवस्था असेल अशी  ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.
           केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी देखील यावेळी संबोधित केले. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे अतिशय कल्पकतेने आपला प्रत्येक प्रोजेक्ट साकार करीत असल्याचे त्यांनी या देखण्या उंच इमारतीच्या उदाहरणावरून दिले. बल्लारपूर येथे तयार झालेल्या नव्या इमारतीतून महाराष्ट्राच्या पोलिस व्यवस्थेतील दर्जेदार कार्याची अपेक्षा राहील, असे त्यांनी सांगितले. बल्लारपूर व परिसरासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनातून आवश्यकता असेल तिथे निधी उपलब्ध करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू झाला.  आता बारामती विकासाचे मॉडेल मागे पडले असून चंद्रपूर हे विकासाचे नवे मॉडेल म्हणून पुढे आले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी बोलताना स्पष्ट केले की, गेल्या सत्तर वर्षात मिळाला नसेल इतका निधी चंद्रपूर जिल्ह्याला ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मिळाला असून जनतेला त्याचे दृश्य परिणाम दिसत आहे. नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी यावेळी बल्लारपूर मतदारसंघात बल्लारपूर नगरपालिकेला गेल्या चार वर्षात मिळालेल्या कोट्यवधीच्या निधीसाठी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक मुंडे यांनी केले.
                                                                        0000