Search This Blog

Wednesday, 15 October 2025

जिल्ह्यातील 3 लक्ष 76 हजार खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम

 

जिल्ह्यातील 3 लक्ष 76 हजार खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम

Ø जिल्हा अग्रणी बँकेचा पुढाकार

Ø दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा जिल्ह्यातील 3 लक्ष 76 हजार 242  खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशीष पोरकुटे यांनी दिली. देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5866 कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या 4612 कोटी, संस्थांच्या 1082 कोटी आणि सरकारी योजनांतील 172  कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.

जिल्हाधिका-यांचे आवाहन : जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी खात्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. ठेवींचा परतावा मिळविण्यासाठी आणि निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ठेवीदारांनी आपल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अद्ययावत केवायसी सादर करावे. बँकांमार्फत या विशेष मोहिमेअंतर्गत जनजागृती शिबिरे आणि संपर्क अभियान राबविण्यात येणार असून, ज्या खातेदारांचे पैसे वर्ग झाले आहेत, त्यांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्व खातेदारांनी आपल्या रकमेचा परतावा मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

संबंधित खातेदारांनी बँकेत संपर्क करावा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित करण्यात येणार आहे. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक आशिष पोरकुटे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment