धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर बार्टीचा ज्ञानमेळावा
Ø 85 टक्के सवलतीच्या दरात पुस्तकविक्री
Ø ग्रंथविक्रीस उस्फुर्त प्रतिसाद
चंद्रपूर, दि. 16 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी सवलतीच्या दरात पुस्तक विक्री आयोजित करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा तसेच त्यांच्या विचारांवर आधारित आणि संवैधानिक मूल्यांचा जागर करणारी पुस्तके विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली होती. पुस्तक विक्रीदरम्यान शासकीय प्रकाशनांवरील पुस्तकांवर 85 टक्के, तर अशासकीय प्रकाशनांवरील पुस्तकांवर 50 टक्के सवलत देण्यात आली.
या पुस्तक विक्रीस धम्मबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी बार्टीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच योजनांचे माहितीपत्रक आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप करण्यात आले.
सदर पुस्तक विक्री स्टॉलचे उद्घाटन विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्टॉलला जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय वंजारी तसेच सामाजकल्याण आणि इतर विभागांतील शासकिय अधिकारी, कर्मचारी यांनी भेट दिली. विविध चळवळीतील आंबेडकरी कार्यकर्ते, विद्यार्थी, अभ्यासक आणि धम्म अनुयायांनीही पुस्तक विक्रीचा भरघोस लाभ घेतला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा असवार आणि विभाग प्रमुख बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशासाठी बार्टी प्रादेशिक कार्यालय, नागपूरचे सा. प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, प्रकल्प अधिकारी आणि समतादूत यांनी परिश्रम घेतले.
००००००००

No comments:
Post a Comment