Search This Blog

Wednesday, 15 October 2025

सखोल गृहपाठ आणि परिश्रम यातुन उत्तम छायाचित्रण करता येते - ज्येष्ठ छायाचित्रकार संगीता महाजन








सखोल गृहपाठ आणि परिश्रम यातुन उत्तम छायाचित्रण करता येते     

-     ज्येष्ठ छायाचित्रकार संगीता महाजन

 

Ø माहिती व जनसंपर्क विभागाची विभागस्तरीय छायाचित्रण कार्यशाळा

 

     नागपूर, दि.15 : शासकीय योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोचवणारा छायाचित्रकार हा शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा असतो. त्यामुळे सखोल गृहपाठ आणि परिश्रम यातून छायाचित्रण करणे गरजेचे आहे.आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत मेहनत करावी, अशा शब्दात ज्येष्ठ छायाचित्रकार संगीता महाजन यांनी मार्गदर्शन केले.

                माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयातर्फे विभागाच्या नागपूर व अमरावती विभागातील शासकीय छायाचित्रकारांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. नागपूर -अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे अध्यक्षस्थानी होते.

               छायाचित्रकार हा विचार शक्तीनुसार कॅमेराची कळ दाबून उत्तमोत्तम छायाचित्र चित्रित करीत असतो. सृजनशील व संवेदनशील छायाचित्रकारीतेसाठी दृष्टिकोन असावा लागतो व तो वाचन, निरीक्षण व सतत अभ्यासाने तयार होतो. दृष्टीकोन हा छायाचित्रकारांसाठी महत्वाचा असतो, असे सांगत शासकीय विभागातील छायाचित्रकारांनी करायची तयारी व घ्यावयाची काळजी घ्यावी.

      शासकीय छायाचित्रकारांची विश्वसनीयता आणि जबाबदारीचे महत्व समजावून सांगताना वेळेत उपस्थित राहणे, आवश्यक साधन सामुग्री बाळगणे, शिस्त व नम्रता, निवडक छायाचित्रांची निवड व साठवण याबाबत माहिती दिली. छायाचित्रातील अचूक कॉम्पोजिंग व सिमीट्री यासोबतच कॅमेरा अँग्लस, प्रकाशाच्या विविध छटा, रूल ऑफ थर्ड, डेफ्थ ऑफ फिल्ड, आयएसओ, अपार्चर, लेन्स आदी तांत्रिक बाबींवर विविध छायाचित्रे व सादरीकणाद्वारे श्रीमती महाजन यांनी मार्गदर्शन केले.

          तत्पूर्वी, संचालक डॉ. गणेश मुळे यांनी कार्यशाळेमागील भूमिका सांगताना छायाचित्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक असल्याचे सांगून शासनात छायाचित्रीकारीतेच्या विविध अंगांचे महत्व उदाहरणासहीत विशद केले. सहायक संचालक पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या कार्यशाळेत नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील शासकीय छायाचित्रकार उपस्थित होते.

                                                           ०००००

 

  

No comments:

Post a Comment