13 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान पशुधनाची लसीकरण मोहीम
चंद्रपूर, दि. 12 : लाळ खुरकत हा रोग अत्यंत संसर्गजन्य, विषाणुजन्य असून त्याचा पशुधन उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे सदर रोग निर्मुलनाचे उद्दष्टि निश्चित करण्यात आले आहे. सलग तीन वर्षे रोग आढळल्यास राज्य लाळ खुरकत मुक्त घोषित होवून मांस निर्यातीचा मार्ग मोकळा होईल.
चंद्रपूर जिल्ह्यात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्यामधील लाळ खुरकत या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्याकरिता लसीकरणाची आठवी फेरी 13 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात 3 लक्ष 25 हजार 928 जनावरांना लस दिली जाईल. केंद्र सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी 3 लक्ष 25 हजार 950 लस मात्रा उपलब्ध झाली आहे. सदर लसीकरण पुढील 45 दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे.
पशुचे आरोग्य जपण्यासाठी व रोगप्रसार रोखण्यासाठी तसेच पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त डॉ. सुरेशकुमार कुंभरे यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment