नाविन्यपूर्ण योजनेतून एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम
Ø शैक्षणिक
सहलीस जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी
चंद्रपूर, दि. 26 : एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत
आयोजित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथून हिरवी झेंडी दाखवून
करण्यात आला. दि. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत चंद्रपूर व
चिमूर प्रकल्पांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ४९ विद्यार्थी व ५
शिक्षक अभ्यास सहलीस रवाना झाले आहेत.
आदिवासी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने या सहलीचे
आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच नवीन ठिकाणांची ओळख, विज्ञान, इतिहास व संस्कृतीचा
प्रत्यक्ष अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व करिअरविषयक दृष्टीकोन व्यापक होण्यास मदत
होते, असे त्यांनी नमूद
केले. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे
हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर शैक्षणिक सहलीदरम्यान
विद्यार्थी राष्ट्रपती भवन, संसद भवन, ताज महल तसेच
मथुरा, जयपूर, जोधपूर व उदयपूर येथील
ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांबाबतची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनीही या
उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
प्रकल्प अधिकारी विकास
राचेलवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले
की, ग्रामीण व दुर्गम
भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून
शिकण्याची संधी देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा सहलींमुळे
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाण व सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो. यापुढेही आदिवासी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू
राहील, असे त्यांनी नमूद
केले.
सहलीस जाणाऱ्या
विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत ब्लेझर, शूज, बॅग व कॅपचे वाटप करण्यात आले. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल
प्रकल्प अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात
आलेला हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शैक्षणिक संधी उपलब्ध
करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरत
आहे.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment