सर्व वाहन चालक/मालकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे
Ø अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 19 : अलीकडच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल (एपीके) तसेच मोबाईल एसएमएस / व्हॉट्सॲपद्वारे पाठविल्या जाणा-या खोट्या लिंकमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व वाहन चालक / मालकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे. तसेच अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही व्हॉट्सॲपद्वारे व इतर मोबाईल ॲपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी. तसेच RTO service.apk, mParivahan_Update.apk अशा अनधिकृत APK ॲप्स / लिंक डाऊनलोड करू नये. कारण त्याद्वारे ओटीपी, बँकिंग माहिती व मोबाईल मधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व वाहन चालक / मालक तसेच सर्व नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून योग्य दक्षता घ्यावी. तसेच याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर किंवा वाहतुक विभागाची संपर्क करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
असे असतात फसवणुकीचे संदेश : 1) आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरीत दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येतात व लगेच दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात. 2) डीएल (वाहन चालविण्याचा परवान) सस्पेंड होणार आहे, त्वरीत तपासणी करा.
या शासकीय संकेतस्थळांचा करा वापर : 1) वाहन नोंदणी सेवा (VAHAN) करीता https://vahan.parivahan.gov.in 2) ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) करीता https://sarathi.parivahan.gov.
येथे करा तक्रार : 1. नॅशनल सायबर क्राईम पोर्टल https://www.cybercrimer.gov.in 2. सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा 3. जिल्हा सायबर पोलिस स्टेशन.
०००००००
No comments:
Post a Comment