शुभमंगल सामूहिक विवाह किंवा नोंदणीकृत विवाहासाठी 25 हजार रुपये अनुदान
चंद्रपूर, दि. 27 : शेतकरी, शेतमजुर, निराधार, परित्यक्त्या व विधवा महिलेच्या मुलीच्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी ‘शुभमंगल सामूहिक विवाह योजना’ शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रशासकीय सहाय्य प्रति जोडपे 25 हजार रुपये देण्यात येते, तर सामूहिक विवाहात लग्न लावलेल्या, नोंदणीकृत विवाह केलेल्या वधूची आई / वधूचे वडिल /वधू यांचे नावाने 25 हजार रुपये अनुदान दिल्या जाते.
या योजनेअंतर्गत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान 5 तर कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील. 100 जोडप्यांच्या वर समावेश असलेल्या विवाह सोहळ्यासाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाही, एका स्वयंसेवी संस्थेस वर्षातून दोनदा सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येईल. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्था नोंदणी अधिनियम 1860 किंवा सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा महाराष्ट्र सहकारी संस्थाचे अधिनियम 1960 अंतर्गत स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असावी. सामूहिक विवाहात सहभागी होणाऱ्या वधुचे वय 18 वर्ष व वरचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वधू ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
आवश्यक कागदपत्रे : बँक खाते तपशील, बैंक शाखा, आयएफसी कोड याबाबतचा तपशील, विवाह झालेल्या जोडप्याचा निबंधक विवाह नोंदणी यांचे प्रमाणपत्र, सदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपये आहे. स्वयंसेवी संस्थेने / लाभार्थ्यांनी खालील बाबीचे एकत्रित प्रमाणपत्र किंवा दाखला अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे. रहिवासी दाखला (पत्याबाबत), जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ तलाठी किंवा ग्रामसेवकाचा दाखला, उत्पन्न दाखला तलाठी/तहसीलदार, विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने सामूहिक विवाहात सहभागी जोडप्यांचे अर्ज एकत्रितपणे, विहित नमुन्यातील माहिती कागदपत्रे तसेच मागणी प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, आकाशवाणीच्या मागे सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे सादर करावे.
००००००

No comments:
Post a Comment