विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचवा – न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर
Ø वरोरा येथे विधीसेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा
Ø 40 स्टॉलची उभारणी ; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
चंद्रपूर, दि. 22 : भारतीय राज्यघटनेमुळे नागरिकांना आपल्या अधिकारांची माहिती होत आहे. मात्र अधिकाराचा वापर कसा करावा, हे अजूनही नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचले नाही. त्यासाठीच विधीसेवेचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे. मोफत विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचविणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर यांनी केले.
जिल्हा तसेच वरोरा तालुका विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याचे उद्घाटन करताना न्यायमूर्ती श्री. नेरलीकर बोलत होते. यावेळी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., वरोरा तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायमुर्ती क्र.1 प्रवीण अभंग, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष गजानन बोढाले, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. कुलकर्णी, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या घटकांना न्याय देणे आवश्यक आहे, असे सांगून न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर म्हणाले, देशाचा प्रत्येक नागरिक हा घटनेचा संरक्षक आहे. मूलभूत अधिकारांची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. न्याय प्रत्येकाला भेटला पाहिजे, हे घटनेचे मूलभूत तत्व आहे. केवळ लाभार्थी म्हणून थांबू नका तर योजनांची माहिती इतरांनाही द्या. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे निदर्शनास येतात. स्त्रियांसाठी अनेक कायदे आहे. राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये विधी सेवा मोफत देण्याच्या सूचना आहेत. अन्याय सहन करत आपण शांत बसलो तर खऱ्या अर्थाने राज्यघटनेची परिपूर्ती होणार नाही.
जिल्हा वकील संघ व तालुका वकील संघानेसुद्धा समाजाच्या शेवटच्या घटकासाठी न्यायदानाचे काम करावे. तळागाळातील प्रत्येक नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा केवळ आपल्या कामापुरते मर्यादित न राहता विधी सेवेचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवावे. विधी सेवेमुळे अनेक अडचणी सुटू शकतात. घटनेची स्वप्नपूर्ती करायची असेल तर नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असेही न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती जााणून घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी केले. संचालन नेहा गोरले व रमा कपील यांनी तर आभार सचिव सुधीर इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
लोकांपर्यंत एकत्रित योजना पोहचविण्याचा मानस : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वरोरा येथे विधी सेवा महरशिबिर व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व योजना एकाच छताखाली देण्याचे नियोजन असल्यामुळे येथे विविध स्टॉल उभारले आहेत. याशिवाय येथे योजनांचा लाभ त्वरित देण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले
नागरिकांना विविध योजनांचा लाभ : यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्योती डाहुले यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यांना लाभ, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत पांडुरंग डोंगरकर यांना ट्रॅक्टर चाबी, सचिन ढोकरे व अविनाश महाजन (वनहक्क पट्टा), बंडु पेटकर (आयुष्यमान भारत कार्ड), नीलिमा गजभिये (आटा चक्की) राहुल दारुडे (सिंचन विहीर), रामकृष्ण ताजणे (ट्रॅक्टर वाटप), भानुदास पेंदाम (वैयक्तिक वनहक्क पट्टा), केशव नगराळे (इनरवेल बोर), मोहन उमरे (ट्रॅक्टर वाटप), वैधवी पवार, मीरा झाडे आणि घनश्याम तळवेकर या बालकांना (श्रवण यंत्र) उपदेश चहांदे यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली.
००००००

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment