Search This Blog

Thursday, 19 February 2026

आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू

 आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू

Ø ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मार्चपर्यंत

चंद्रपूर, दि. 19 : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता आरटीई 25 टक्के प्रवेश आरक्षणांतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2026-27 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. जिल्ह्यातील 184 शाळांमधील 1630 प्रवेशाच्या राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेशाकरीता 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज घेण्यात येत आहे.

सदर प्रवेशाकरीता पालकांनी http://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. बालकांच्या पालकांनी आरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचण किंवा अन्य काही शंका असल्यास तालूका स्तरावरील पंचायत समिती / गटसाधन केंद्र येथील मदत / सहाय्य केंद्राशी संपर्क करावा. विहीत मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणर नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तरी पात्र व इच्छूक पालकांनी सदर प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे (प्राथ.) यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment