विशेष लेख :
“मराठी भाषेचे संवर्धन आणि संगोपन”
चंद्रपूर : “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य, एकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी”
वरील सुरेश भटांच्या कवितेतील पंक्तीप्रमाणे, खरंच आपण खूप भाग्यवान, नशीबवान आहोत कारण, ज्या भूमीला अनेक संतांचा, थोरांचा, विरांचा, समाजसुधारकांचा वारसा लाभला, अशा भूमीत आपला जन्म झाला. भारतातील विविध राज्यांपैकीच एक राज्य म्हणजेच आपला “महाराष्ट्र” होय. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांत व राज्यांची पुनर्रचना झाली. साधारणतः ही रचना भाषावार प्रांतरचना झाली. सुरुवातीस केंद्र सरकारने मुंबई सोबत महाराष्ट्र राज्य बनण्यास नकार दिला. त्या विरोधात आंदोलने करण्यात आली. या आंदोलनामध्ये 105 वीरांनी बलिदान दिले. अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या आंदोलनामध्ये बलिदान देणाऱ्या 105 वीरांचे, हुतात्म्याचे स्मरण महाराष्ट्र दिनानिमित्त आजही केले जाते. महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये ‘राष्ट्र’ या नावाने संबोधले जात. सम्राट अशोकाच्या काळात हा प्रदेश ‘राष्ट्रीक’ आणि नंतर ‘महाराष्ट्र’ या नावाने ओळखला जाऊ लागला. हे नाव प्राकृत भाषेतील ‘महाराष्ट्री’ या नावावरून पडले असल्याची शक्यता इतिहासतज्ञांनी वर्तवीली.
भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक भाषा म्हणजेच “मराठी भाषा” होय. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्यापैकी, मराठी ही भाषा जगातील 10 वी व भारतातील 3 भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची भाषा म्हणजेच ‘मराठी भाषा’ होय. महाराष्ट्राला मराठी या मातृभाषेचा वारसा लाभल्यामुळे हजारो वर्षापासून खेड्यांमध्ये, शहरांमध्ये मायबोली मराठी भाषा बोलली जाते. म्हणूनच महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे असे आपण ठामपणे म्हणू शकतो. “विवेकसिंधू” हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ‘मुकुंदराज’ यांनी लिहिला. म्हणूनच त्यांना मराठीचे ‘आद्यकवी’ मानले जाते. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, कवी ग्रेस, नामदेव ढसाळ, ग. दि. माडगूळकर, नारायण सुर्वे, नरहर कुरंदीकर, अशा अनेक लेखकांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा सांगितलेला आहे. एवढेच नव्हे तर, दरवर्षी 27 फेब्रुवारी कवी ‘कुसुमाग्रज’ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीला स्मरण म्हणून “मराठी राजभाषा दिवस” साजरा केला जातो. कवी ‘कुसुमाग्रज’ म्हणजेच ‘विष्णू वामन शिरोडकर’ हे मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते.
माझ्या मराठीची बोलू कौतुके I
परी अमृतातेही पैजासी जिंके I
ऐसी अक्षरे रसिके I मेळवीन II
वरील संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा विचार करता, माझ्या मराठीचे शब्द कौतुकाचे वाटतात, अमृताशी जरी पैज लावली, तरी पैज जिंकेल कारण, मराठी भाषेत अमृतापेक्षाही गोडवा व माधुर्य अधिक आहे असा अर्थबोध होतो. मराठी भाषा ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक आहे. मराठी भाषेचा उगम महाराष्ट्रीयन प्राकृत भाषेपासून झाला. मराठी भाषेच्या ‘12 व्यापक बोलीभाषा प्रदेश’आहे. मराठी बोलीचे दोन प्रकार आहेत प्रमाण मराठी आणि वऱ्हाडी मराठी बोली. मराठी भाषेने प्रसिद्ध कवी, लेखक आणि विद्वान निर्माण करून अनेक कवितेच्या, साहित्याच्या निर्मितीत भर घातला. मराठी भाषेचा इतिहास हा शतकानूशतके जुना आहे. मराठीचे वय जवळपास 2000 वर्ष पूर्व आहे. मराठी भाषेमुळेच आपण लेखन, वाचन शिकलो. म्हणूनच मराठी भाषेचे महत्त्व हे अतुलनीय आहे. मराठी भाषेची महत्ता लक्षात घेता, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे 3 ऑक्टोंबर 2024 रोजी मराठी भाषेला “अभिजात” दर्जा मिळाला.
महाराष्ट्रामध्ये घरोघरी मराठी मायबोली ही भाषा बोलली जाते. परंतु दिवसेंदिवस वाढत्या इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे मराठी भाषा जपणे काळाची गरज ठरत आहे. आजघडीला बरेच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेमध्ये दाखल करतात म्हणूनच मराठी शाळा ओस पडल्याचे दुर्दैवी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे आहे. सगळीकडे इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा इंग्रजी भाषेतून बरेचसे व्यवहार केले जाते. आपण आपल्या विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण ही मातृभाषेतून करतो. आपल्या प्रतिभेला वाव आपल्या मातृभाषेतूनच मिळतो. म्हणूनच आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेशी निगडित राहणे, एकनिष्ठ राहणे फार महत्त्वाचे आहे.
आपण आपली मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी शक्य असेल तिथे मराठीचाच वापर करावा. सर्वांशी संवाद साधताना सर्वप्रथम, तो संवाद मराठीतून सुरू करावा त्यानंतर आवश्यकता भासल्यास इतर भाषांचा आधार घ्यावा. दर महिन्याला किमान एक तरी मराठी पुस्तक विकत घेऊन त्याचे वाचन करावे व शक्य झाल्यास इतरांना देखील पुस्तक घेण्यास प्रवृत्त करावे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या विविध संस्था तसेच व्यक्तींना यथाशक्ती मदत करावी. सोबतच, ज्यांना मराठी वाचता, लिहिता येत नाही अशा व्यक्तींना मराठी शिकविण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक मराठी माणसांच्या दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग आणि दिवसाचा शेवट गुड नाईट अशा संदेशाने होतो. असे अनेक संदेश जर मराठी भाषेमध्ये दुसऱ्यांपर्यंत पोहचविले तर, त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत होईल. अशा प्रकारचे अनेक छोटे-मोठे बदल आपण आपल्या दैनंदिन जीवनात करून, त्यावर प्रत्यक्ष अमल केला तर, नक्कीच मराठी भाषा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल. एक महाराष्ट्रीयन म्हणून मराठी भाषेला जगवणे, तिला जपणे आपले आद्य कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. म्हणूनच दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि “27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवसाचे” औचित्य साधून आपण सर्वांनी एकत्रित येऊया, आपल्या मायबोलीचे, मातृभाषेचे संवर्धन आणि संगोपन करू या.
कु. प्रणाली ज. शेंडे
जनता महाविद्यालय चंद्रपूर.
०००००००
प्रिय प्रणाली,
ReplyDeleteतुमचा लेख अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्तक आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी तुम्ही दिलेले उपाय खरंच प्रभावी आहेत. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे.
दररोजच्या संवादात मराठीचा अधिकाधिक वापर करणे, मराठी साहित्य वाचणे आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तसेच, ज्यांना मराठी शिकायची इच्छा आहे त्यांना मदत करणे हेही आपल्या भाषेच्या वृद्धीसाठी मोठे पाऊल ठरेल.
सामाजिक माध्यमांवरही आपण मराठीतून विचार मांडले पाहिजेत. मराठीमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणे, लेखन करणे आणि चर्चेत मराठी वापरणे हे छोटे बदल मोठा प्रभाव निर्माण करू शकतात.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेच्या जतनासाठी एकत्र यावे ही कल्पना खरोखरच प्रेरणादायी आहे.
तुमच्या या सुंदर विचारांसाठी धन्यवाद! मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य करूया.
धन्यवाद,
अनंत महाले