25 लाखाच्या अनधिकृत कापूस बियाण्यांवर कृषी विभागाची कारवाई
चंद्रपूर, दि. 5 मे: शासनाने प्रतिबंधित केलेले आर.आर. बि. टी. बियाणे वाहतूक करताना आढळून आले असता कृषी विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून तब्बल 25 लाख रुपये किमतीचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त केले आहे.
लॉकडाऊन दरम्यान गोंडपिपरी खेडी मार्गावरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच 31 ए. एक्स.9882 ची नाकाबंदी करून पोलिस दूरक्षेत्र बेंबाळ पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित कापूस बियाणे आढळले. या आढळलेल्या बियाण्यांची तपासणी तालुका कृषी अधिकारी मुल प्रशांत कसराळे यांनी केली असता. यामध्ये प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणांची तब्बल 3 हजार 500 पाकिटे आढळून आली. या सर्व पाकिटांची अंदाजित रक्कम ही रुपये 25 लक्ष 55 हजार इतकी आहे. यापूर्वीही मागील वर्षी तब्बल 7 प्रकरणात कृषी विभागाने कार्यवाही करून विविध पोलीस स्टेशनमध्ये अनाधिकृत कापूस बियाणे मध्ये गुन्हे नोंदविलेले आहेत.
सदर कारवाई करताना कृषी विभागातून तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, मंडळ कृषी अधिकारी तिजारे, कृषी पर्यवेक्षक उईके तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रशांत मडावी उपस्थित होते. यावेळी कृषी सहसंचालक नागपूर विभाग,नागपूर येथील तंत्र अधिकारी पवार व कृषी अधिकारी केचे हे देखील गुणनियंत्रक विभागामार्फत उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल तानू रायपुरे, प्रकाश फुलके, आनंदराव तितरमारे, देविदास वेलादी व उज्वल साखरकर हे अधिक तपास करीत असून त्यांनी या प्रकरणी वाहन चालक व मालक अब्दुल रशीद रऊफ शेख वय 32 वर्षे राहणार नागपूर याला अटक करून त्याच्याविरुद्ध भा.दं.वि कलम 420, बी-बियाणे कायदा, कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनधिकृत एचटीबीटी बियाणे वापर न करण्याचे पुनश्च आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment