Ø परराज्यातील मजुर, कामगार, विद्यार्थी यांनी आपल्या नावाची नोंद करावी
Ø ग्रामीण भागातील मजुरांनी संबंधित तहसीलदारांकडे नावाची नोंद करावी
Ø नगरपालिका क्षेत्रातील मजुरांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे नोंद करावी
Ø चंद्रपूर महानगरातील मजुरांनी मनपा आयुक्तांकडे नोंद करावी
Ø जिल्ह्यातील नागरिकांनी परप्रांतियांना मदत करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 10 मे : चंद्रपूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या जम्मू- कश्मीर , लडाख व अन्य राज्यातील मजुर, श्रमिक, विद्यार्थ्यांनी ते ज्या भागात आहेत. त्या भागातील तहसीलदार , नगरपालिकांचे मुख्य अधिकारी, महानगर पालिका आयुक्त कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
चाळीस-बेचाळीस दिवसांच्या लॉक डाऊन कालावधीनंतर जे कामगार ,श्रमिक,विद्यार्थी,ज्या प्रदेशातील असतील त्या प्रदेशात त्यांना पोहोचण्यात सुलभता व्हावी यासाठी काही विशेष रेल्वे केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात जम्मू-काश्मीर व लडाख भागात जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यानंतर देशाच्या अन्य राज्यातही कामगारांना घेऊन जाण्यासाठी रेल्वे गाड्या नियोजित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना देखील विनंती करण्यात येते की, त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या माहितीमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व राज्यांच्या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करावी. त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी व त्यांना अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध होत असल्याची माहिती पुरवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी या संदर्भात विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या मजुरांनी ते ज्या भागात राहतात. त्या भागातील तहसीलदार, व चंद्रपूर शहरासाठी महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात अडचण असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक 07172-251597 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी जिल्ह्यातून बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील मजुरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहे. सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचे अडकलेले तेलंगाना व आंध्रप्रदेश येथील नागरिकांना जिल्ह्यात परतीसाठी 2 रेल्वे गाड्यांनी हजारो नागरिक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोहोचले आहे.
नजीकच्या काळात गुजरात ,राजस्थान, दिल्ली यांच्यासह दक्षिण भारतातील अनेक भागात रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य राज्याच्या कामगार मजूर श्रमिक विद्यार्थी यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे तशी नोंद करणे गरजेचे आहे.अन्य राज्याच्या भागातील नागरिकांना भाषेच्या समस्येमुळे संपर्कासाठी अडचण येत असल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाची त्यांचा संपर्क घडवून आणावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
000000

No comments:
Post a Comment