मार्च अखेरपर्यंत जलयुक्त शिवारची 100 टक्के कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी विनय गौडा
चंद्रपूर, दि. 04 मार्च : जलयुक्त शिवार अभियान 2.0 ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा शासन स्तरावरून नियमित आढावा घेतला जातो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी मार्च 2025 पर्यंत जलयुक्त शिवारची सर्व कामे 100 टक्के पूर्ण करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू, मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता निलीमा मंडपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू होऊन आता दोन वर्षे झाली आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या योजनेंतर्गत कामे प्रलंबित असेल तर संबंधित यंत्रणेने गांभिर्याने लक्ष देऊन ती पूर्ण करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत मार्च अखेरपर्यंत 100 टक्के कामे पूर्ण व्हायला पाहिजे. कामे, निविदा, निधी आदींबाबत काही अडचण असल्यास तात्काळ कळवा. प्रलंबित कामांचा प्रत्येक यंत्रणेने नियमित पाठपुरावा करावा. ई-निविदा करून सर्व कामांचे कार्यारंभ आदेश त्वरीत द्या. कृषी विभागाकडे प्रलंबित कामे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी सर्व तालुका कृषी अधिका-यांची प्रत्येक आठवड्यात बैठक घ्यावी व कामे पूर्ण करण्याबाबत सुचना द्याव्यात. तसेच प्रत्येक आठवड्यात कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा.
यावेळी जिल्हाधिका-यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे सुरू असलेले कृषी विभाग, वन विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा, नरेगा, लघुसिंचन या विभागांच्या कामाचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत एकूण 233 गावांची निवड करण्यात आली असून एकूण 3320 कामे सुरू आहेत, असे कार्यकारी अभियंता निलीमा मंडपे यांनी सांगितले.
००००००
No comments:
Post a Comment