वनहक्क समिती सदस्यांना बांबु व्यवस्थापनाचे धडे
चंद्रपूर, दि. 7 मार्च : वनहक्क कायदा - 2006 अंतर्गत सामुहिक दावे मंजूर झालेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील क्रियाशील वनहक्क समिती सदस्याना ‘सामुहिक वनहक्क उपजीविकेसाठी बांबूचा वापर आणि सी. एफ. आर. भागात ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्यातर्फे वन अकादमी येथे आयोजित करण्यात आले आहे.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण 10 टप्यात आयोजित केले आहे. ज्यातून चंद्रपूर व गडचिरोली मधील विविध क्रियाशील वनहक्क समितीच्या 300 सदस्यांना या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचे एकूण तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथा टप्पा नुकताच वन अकादमीमध्ये पार पडला.
यात नागभीड तालुक्यातील खडकी, येनोली, कोदेपार, देवपायली, सोनुली (खुर्द) व ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता, मेंडकी, शिवसागर तुकूम, कळमगाव, मालडोंगरी, रामपुरी, नवेगाव, जवराबोडी (मेंढा) अशा 13 क्रियाशील वनहक्क समितीतील 25 सदस्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. बांबू क्षेत्राचे व्यवस्थापन व बांबू क्षेत्राला चालना देणारे एक मोठे भागधारक म्हणून या वनहक्क समित्या आहेत. वनहक्क कायदा, ग्रामसभेच्या जबाबदाऱ्या व उत्तरदायित्व, बांबू लागवड त्याचे व्यवस्थापन, बांबूचे निष्कासन – विक्री आगार व्यवस्थापन, बांबूचा मूल्यवर्धित उपयोग इ. महत्वाच्या विषयावर विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले.
००००००
No comments:
Post a Comment