Search This Blog

Tuesday, 25 March 2025

राज्यस्तरीय समितीमध्ये चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

 


राज्यस्तरीय समितीमध्ये चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

Ø महसूल अधिकाऱ्यांची कार्यविषयक नियमपुस्तिका

चंद्रपूर, दि. 25 मार्च : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्याविषयक नियमपुस्तिका तयार करण्याकरिता विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत समितीमध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी ऐवजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी असा बदल करण्यात आला असून चंद्रपूर आणि नांदेड जिल्हाधिका-यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे सुधारीत शुध्दीपत्रक आज 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची कार्यविषयक नियमपुस्तिका तयार करण्याबाबत गठीत समितीचे अध्यक्ष हे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त असून सदस्य सचिव म्हणून कोकण विभागाचे उप आयुक्त (महसूल) हे आहेत. इतर सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर, अहिल्यानगर, जालना, जळगाव, नांदेड यांचा समावेश आहे.

गठीत करण्यात आलेल्या समितीने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अनुषंगिक महसूल विषयक योजना / धोरणे इत्यादींचा अभ्यास करून शासनास तीन महिन्यात शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

००००००

No comments:

Post a Comment