सर्वधर्मीय सण अतिशय आनंदाने साजरे करा जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
Ø जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक
चंद्रपूर, दि. 27 मार्च : चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. जिल्ह्याचा हा लौकिक कायम ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, महाकाली यात्रा, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे आदी सण साजरे होणार आहे. हे सर्व सण अतिशय आनंदाने आणि शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलिस अधीक्षक नियोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.
सर्वधर्मीय सण साजरे करताना प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येकाला आपले धार्मिक सण साजरे करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. मात्र सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी सुद्धा घ्यावी. नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना होणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क रहावे. गल्ली, मोहल्ला, सोसायटी येथील सर्वांना शांततेचे महत्व समजून सांगावे. सोशल मीडियाचा वापर हा चांगला आणि वाईटसुद्धा होऊ शकतो. प्रत्येकाने जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा हा कदाचित जिल्हा, राज्य किंवा देशाबाहेरचा सुद्धा राहू शकतो. मात्र अशा पोस्टमुळे आपल्या जिल्ह्यात काही दुष्परिणाम होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आपापल्या ग्रुपमध्ये सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
जिल्हा प्रशासनाचे नियम पाळा - पोलीस अधीक्षक सुदर्शन
पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांततेसाठी ओळखला जातो. सर्वधर्मीय सण साजरे करताना येथील गुन्ह्यांची संख्या नगण्य आहे. नागपूरच्या घटनेवर जिल्हा पोलिस प्रशासन अतिशय अलर्ट असून जागोजागी बैठकांचे सत्र सुरू आहे. आपल्या परिसरात युवकांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून सांगावे. बऱ्याचशा पालकांना आपली मुलं सोशल मीडियावर काय करतात, याची कल्पना नसते. त्यामुळेच जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचे नियम सर्वांनी पाळावेत व प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन यांनी केले.
मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, सदस्यांच्या सूचनेनुसार सर्वधर्मीय सणांमध्ये पाणीपुरवठा नियमित होणार आहे. रामनवमीच्या दिवशी शहरातील संडे मार्केट बंद राहील. तसेच महाकाली यात्रेपूर्वी शहरातील रस्ते चांगले होणार असून रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
अशा आहेत नागरिकांच्या सूचना - सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा नियमित व्हावा, सण साजरे करताना इतर धर्मीयांच्या भावना दुखावू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण ठेवावे, शहरातील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, अवैध धंद्यांना आळा घालावा, मिरवणुकीचे आयोजन करणाऱ्या प्रमुख प्रतिनिधींची जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले. आभार पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी मानले. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, दक्षता समितीचे सदस्य व जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment