कुष्ठरोग निर्मूलनाकरीता आनंदवन येथे 'रन फॉर लेप्रसी' मॅराथॉन
250 नागरिकांचा सहभाग
चंद्रपूर, दि. 16 मार्च : सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याकरिता जिल्हयात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आनंदवन, वरोरा येथे सहाय्यक संचालक आ. सेवा (कुष्ठरोग), तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरोरा व महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन येथे रन फॉर लेप्रसी मॅराथॉन (पुरुष गट व महिला गट) चे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. विकास आमटे, डॉ. पोळ, डॉ. मृणाल काळे, तानाजी बायस्कर, शौकत अली, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, मुख्याधिकारी श्रीमती शेळकी, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, क्षयरोग अधिकारी डॉ. ललीत पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, डॉ. कांचन टेमुर्डे, डॉ. पराग जिवतोडे आदी उपस्थित होते.
सदर मॅराथॉन मध्ये 250 नागरीकांनी सहभाग घेतला. पुरुष गटातुन प्रथम क्रमांक (4000 रुपये) पंकज आत्राम, व्दितीय क्रमांक (2500 रुपये) साईनाथ पुंगाटी तर तृतीय पुरस्कार (1500 रुपये) सौरभ कन्नाके यांना मिळाला. तसेच महिला गटातुन प्रथम पुरस्कार (4000 रुपये) रुचिका नागरकर, व्दितीय पुरस्कार (2500 रुपये) श्रध्दा थोरात, तृतीय पुरस्कार (1500 रुपये) लक्ष्मी पुंगाटी यांना सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयाकडुन धनादेश वितरीत करण्यात आले.
कुष्ठरोगाबाबत जे समज, गैरसमज आहेत ते दूर करणे, जनसामान्यांमध्ये कुष्ठरोगाबाबत जागृकता निर्माण करणे तसेच लोक सहभागातुन कुष्ठरोग निर्मुलनाची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी यावेळी केले. महिला व पुरुष मॅराथॉनची सुरुवात हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आली.
कुष्ठरोगाची लक्षणे : हा रोग मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतुमूळे होणारा एक अत्यल्प सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोग हा मुख्यतः चेतातंतु व त्वचेचा रोग आहे. कुष्ठरोग या आजारामध्ये त्वरीत उपचार व योग्य काळजी न घेतल्यास कायमची विकृती येते. कुष्ठरोग अनुवांशीक नाही. मायकोबॅक्टेरीयम लेप्री या जंतुमूळे कुष्ठरोग होतो. कुष्ठजंतुचा प्रसार हा उपचार न घेतलेल्या सांसर्गिक कुष्ठरुग्णांच्या खोकल्यातुन, शिंकण्यातुन हवेत पसरतात आणि निरोगी व्यक्तीला श्वसनमार्गातुन कुष्ठजंतुचा प्रसार होतो. वेळीच उपचार न घेतल्यास कुष्ठरोगामुळे चेतातंतु बाधीत होऊन कायमची शारीरीक विकृती येवू शकते व अवयव अकार्यक्षम होतो. कुष्ठरोगात फिकट, लालसर व उंचावलेले चट्टे तसेच त्वचा तेलकट व गुळगुळीत होते. कानाच्या पाळया जाड होतात व काही रुग्णांच्या चेह-यावर व हातापायावर सुज येते किंवा शरीरावर गाठी येतात.
अशी घ्यावी काळजी : लक्षणे आढळल्यास आपल्या विभागातील सीएचव्ही, आरोग्य कार्यकर्ती/आरोग्य कर्मचारी कींवा नजीकच्या सरकारी दवाखान्यात जावुन तपासुन घ्यावे. सर्व सरकारी, निमसरकारी दवाखाने, म.न.पा. मधील सर्व आरोग्य केंद्रे व दवाखाने येथे खात्रीचा आधुनिक गुणकारी उपचार मोफत उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने बहुविध औषधोपचार हा ६ कींवा १२ महीने नियीमत घेवून पुर्ण केल्यास कुठल्याही स्थीतीत कुष्ठरोग हा पुर्णपणे बरा होतो व संभाव्य विकृती टाळता येते.
००००००
No comments:
Post a Comment