Search This Blog

Monday, 3 March 2025

आश्रम शाळेतील शिक्षकांची जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील शाळांना भेट



 आश्रम शाळेतील शिक्षकांची जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील शाळांना भेट

चंद्रपूर, दि. 03 मार्च : जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर मार्फत मुल्यमापन, सनियत्रंण व उपयुक्तता तपासणी योजनेच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर  अंतर्गत येणाऱ्या शासकीय /अनुदानित एकलव्य आश्रम शाळेतील शिक्षकांकरीता एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.

आश्रम शाळेतील 41 शिक्षकांना जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील  शाळा  दाखविण्यात आल्या. यात जिल्हा परिषद डिजीटल प्राथमिक शाळा खराशी (जि. भंडारा) व पीएमश्री जवाहरलाल नेहरु नगर परिषद शाळा गडचिरोली या शाळांना भेटी देण्यात आल्या. सदर शाळांमध्ये विविध नाविण्यपुर्ण उपक्रम घेतले जातात. भेटीदरम्यान शाळेतील विविध उपक्रमांचा शिक्षकांनी अनुभव घेतला. यात दैनिक परीपाठ, डीजीटल अंगणवाडी, बोलके वर्ग व बोलके विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांची स्वयं अध्ययन क्षमता, शिक्षक अध्यापन पद्धती, डिजिटल यंत्राचा प्रत्यक्ष वापर, शाळेचे आनंददायी वातावरण, दप्तरविना शाळा, सुट्टीच्या दिवशीची शाळा, विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड यांचा समावेश होता. 

             सदर शाळा भेटी दरम्यान प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी युवराव चव्हाण, महेश गिरडकर, प्रविण कुळसंगे, सुरेश श्रीरामे हे शिक्षकांसोबत उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता शाळेत विविध शैक्षणिक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक असते. त्या दृष्टिने शिक्षकांना विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची भर मिळावी, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांकरीता व्हावा हा उद्देश समोर ठेवून सदर शाळाभेटीचे आयोजन प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात आले होते. उपक्रमशील शिक्षकच एक गुणवत्तपुर्ण विद्यार्थी तयार करू शकतो. सदर शाळांना भेटी दरम्यान शाळेतील विविध नाविण्यपूर्ण उपक्रम, प्रगत विद्यार्थी, बोलके विद्यार्थी, विविध शैक्षणिक साहित्य, डिजिटल वर्ग यांचा अनुभव शिक्षकांना घेतला.  तेव्हा यांचा उपयोग आश्रम शाळेतील ‍विद्यार्थ्यांकरीता करता येईल व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी यामुळे मदत होईल.

 सदर अभ्यास दौऱ्याकरीता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा  जी.सी. यांचे विशेष आभार मानले.

०००००

No comments:

Post a Comment